रत्नागिरी : तुर्की-इस्तांबुल सहलीचे आमिष, रत्नागिरीतील दोन महिलांची १२.४० लाखांची ऑनलाइन फसवणूक

banner 468x60

परदेश सहलीचे आकर्षक स्वप्न दाखवून रत्नागिरीतील दोन महिलांची तब्बल १२ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ‘मेक माय टूरएक्स’ (Make My Tourx) या नावाने टूर पॅकेजची जाहिरात करणाऱ्या कंपनीने तुर्की-इस्तांबुल सहलीचे आमिष दाखवत मोठी आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार समोर आली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दिल्लीतील संशयिताविरुद्ध पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

banner 728x90


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २४ एप्रिल २०२४ ते ११ जून २०२४ या कालावधीत ही फसवणूक करण्यात आली. फिर्यादी समृद्धी सुदेश मयेकर (वय ४५, रा. थिबा पॅलेस रोड, रत्नागिरी) यांनी आपल्या मैत्रिणीसह परदेश पर्यटनासाठी ‘मेक माय टूरएक्स’ या कंपनीशी संपर्क साधला होता. त्यावेळी कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगणाऱ्या संदिप कुमार (रा. रोहिणी, दिल्ली) याने आकर्षक टूर पॅकेज, प्रवासाचे नियोजन, व्हिसा प्रक्रिया आणि इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून देण्याचे आश्वासन देत त्यांचा विश्वास संपादन केला.

या विश्वासाच्या आधारावर समृद्धी मयेकर यांनी ५ लाख रुपये, तर त्यांच्या मैत्रीण वैभवी विजय खेडेकर यांच्या कुटुंबासाठी ७ लाख ४० हजार रुपये अशा एकूण १२ लाख ४० हजार रुपयांची रक्कम आरोपीने सांगितलेल्या विविध बँक खात्यांमध्ये जमा केली.

मात्र, संपूर्ण रक्कम भरूनही ठरल्याप्रमाणे परदेश दौऱ्याचे कोणतेही नियोजन करण्यात आले नाही. सहलीची तारीख वारंवार पुढे ढकलण्यात आली. फिर्यादींनी सातत्याने संपर्क साधूनही आरोपीने केवळ आश्वासने दिली. अखेर सहलही झाली नाही आणि भरलेली रक्कमही परत करण्यात आली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर समृद्धी मयेकर यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संदिप कुमार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३१८(४) अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आर्थिक व्यवहार, बँक खात्यांचा तपशील आणि ऑनलाइन संपर्काच्या माध्यमांचा तपास सुरू असून, आरोपीचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन टूर पॅकेज बुक करताना नागरिकांनी संबंधित कंपनीची नोंदणी, कार्यालयाचा पत्ता, ग्राहकांची मते आणि अधिकृत व्यवहाराची खात्री करूनच पैसे भरावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. आकर्षक सवलती आणि परदेश सहलींच्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी सखोल पडताळणी करणे आवश्यक असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *