Breaking News

रत्नागिरी : विद्यार्थ्यांच्या सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्यासाठी रत्नागिरी पोलिसांचे कौतुकास्पद पाऊल‘मिशन रायझिंग फ्लॉवर्स’अंतर्गत महिला सुरक्षा समिती व भरोसा सेलची संयुक्त बैठक

banner 468x60

विद्यार्थ्यांच्या सुरक्षित, सक्षम आणि उज्ज्वल भविष्यासाठी रत्नागिरी पोलीस दलामार्फत ‘मिशन रायझिंग फ्लॉवर्स’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे महिला सुरक्षा समितीवरील अशासकीय सदस्य तसेच भरोसा सेल समितीवरील सदस्यांची विशेष संयुक्त बैठक पार पडली.

या बैठकीस रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्यासह संबंधित समित्यांचे सदस्य उपस्थित होते. यावेळी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी उपस्थित सदस्यांना ‘मिशन रायझिंग फ्लॉवर्स’ या उपक्रमाची उद्दिष्टे, कार्यपद्धती आणि विद्यार्थ्यांपर्यंत या मोहिमेचा प्रभावीपणे पोहोचविण्याबाबत सविस्तर माहिती दिली.

विद्यार्थ्यांना त्यांच्या वयात भेडसावणाऱ्या विविध सामाजिक, मानसिक आणि सुरक्षेशी संबंधित समस्यांबाबत योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणे, त्यांना योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देणे तसेच आवश्यकतेनुसार त्यांना मदत मिळवून देणे, या दृष्टीने या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

यावेळी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी महिला सुरक्षा समिती आणि भरोसा सेलच्या सदस्यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना आवश्यक व मोलाचे मार्गदर्शन करावे आणि जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या उपक्रमाचा संदेश पोहोचवावा, असे आवाहन केले.

बैठकीदरम्यान उपस्थित सर्व सदस्यांनी रत्नागिरी पोलीस दलाच्या या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचून त्यांच्यामध्ये सुरक्षिततेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी तसेच योग्य मार्गदर्शन करण्यासाठी पोलीस प्रशासनाला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही सदस्यांनी दिली.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत त्यांच्यासाठी मार्गदर्शन, जनजागृती आणि संरक्षणाचा व्यापक उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने ‘मिशन रायझिंग फ्लॉवर्स’ हे रत्नागिरी पोलीस दलाचे महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *