रत्नागिरी जिल्ह्यात पैशांच्या व्यवहारावरून झालेल्या वादातून मंडप डेकोरेटरला मारहाण करून त्याच्या पत्नीवरही दांडक्याने हल्ला केल्याची घटना रत्नागिरी शहरानजीक मिरजोळे येथील पाडावे वाडी परिसरात घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाडावे वाडी, मिरजोळे येथील पवार एलिगन्सी इमारतीच्या पार्किंगखाली २६ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी विजय भिकाजी शिर्के (४९, मंडप डेकोरेटर, रा. पाडावे वाडी, मिरजोळे) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, राजा गाडेकर याने विजय शिर्के यांना पवार एलिगन्सीच्या पार्किंगखाली बोलावून घेतले. त्याठिकाणी काळी दाढी असलेल्या, चॉकलेरी रंगाचा शर्ट आणि काळी ट्रॅक पॅन्ट परिधान केलेल्या एका व्यक्तीने रोहन गाडेकर याच्याकडून घेतलेले पैसे परत न दिल्याच्या कारणावरून शिर्के यांच्या डाव्या पायावर गुडघ्याखाली तसेच उजव्या पायाच्या पोटरीखाली मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
पतीला सोडविण्यासाठी विजय शिर्के यांच्या पत्नी घटनास्थळी आल्या असता त्यांच्यावरही दांडक्याने हल्ला करून डोक्यात मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. यावेळी संबंधित व्यक्तींनी शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी २७ ऑगस्ट रोजी पहाटे २.१० वाजता रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९१/२०२६ दाखल करण्यात आला. भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम ११८(१), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपींपैकी दोघांची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नसल्याचे पोलिस नोंदीत नमूद आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिसांकडून सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













