अवघ्या काही महिन्यांत गुंतवणूक दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला रत्नागिरी सत्र न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली आहे. सुमारे १५ वर्षे चाललेल्या कायदेशीर प्रक्रियेनंतर हा महत्त्वपूर्ण निकाल लागला असून, गुंतवणूकदारांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
या प्रकरणातील आरोपी योगेश गणपत चव्हाण (रा. नवी मुंबई) याला न्यायालयाने ५ वर्षे सश्रम कारावास आणि १ लाख ५५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरोपीने २०१० साली ‘ड्रीम नॅचरल लँड डेव्हलपर्स’ या कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना आकर्षित केले. कंपनी बंद पडल्यानंतरही त्याने ‘स्वरा इंटरप्रायझेस’ या नावाने नवीन बेकायदेशीर कंपनी सुरू करून फसवणुकीचा डाव सुरूच ठेवला.
विशेष म्हणजे, या कंपनीची कोणतीही अधिकृत नोंदणी नव्हती. तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) किंवा सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) यांची कोणतीही परवानगी आरोपीने घेतलेली नव्हती. तरीही ४ ते ६ महिन्यांत पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून त्याने नागरिकांकडून तब्बल ३४ लाख ३५ हजार रुपये गोळा केले.
मात्र ठरलेली मुदत संपल्यानंतरही गुंतवणूकदारांना पैसे परत न करता आरोपीने विश्वासघात केला. याशिवाय कोणताही वैध परवाना नसताना सावकारी व्यवसाय चालविल्याचेही तपासात उघड झाले.
या प्रकरणी पोलीस हवालदार प्रभाकर कदम यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार ६ जुलै २०१० रोजी आरोपीला अटक करण्यात आली होती. मात्र जामिनावर सुटल्यानंतर तो बराच काळ फरार होता. नंतर दुसऱ्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर त्याला पुन्हा या खटल्यासाठी न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
खटल्यादरम्यान सरकारी पक्षाने एकूण ३० साक्षीदारांची साक्ष नोंदवली. सरकारी वकील ॲड. प्रफुल्ल साळवी यांनी प्रभावी युक्तिवाद करत आरोपीविरुद्ध ठोस पुरावे सादर केले.
रत्नागिरी सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपीला दोषी ठरवले. भारतीय दंड संहिता कलम ४२० (फसवणूक), ४०६ (विश्वासघात), तसेच मनी सर्क्युलेशन ॲक्ट आणि सावकारी अधिनियमांतर्गत गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने आरोपीला कारावास व दंडाची शिक्षा सुनावली.
या निकालामुळे अशा प्रकारच्या फसवणुकीला आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













