रत्नागिरी : अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करणाऱ्या कोकणनगरमधील आरोपीला तीनवर्षे सक्तमजुरी आणि पन्नास हजार रुपये दंड

banner 468x60

रत्नागिरी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी आरोपी सफीउल्ला समीर सोलकर (वय २४, रा. कोकण नगर, रत्नागिरी) या तरुणाला न्यायालयाने दोषी ठरवत तीन वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. रत्नागिरी येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने हा निकाल दिला असून, अशा प्रकारच्या गुन्ह्यांविरोधात कडक भूमिका कायम असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.

banner 728x90

या प्रकरणातील आरोपी सफीउल्ला समीर सोलकर (वय २४, रा. कोकण नगर, रत्नागिरी) याने आपल्या ओळखीच्या अल्पवयीन मुलीला वारंवार त्रास दिल्याचे तपासात उघड झाले. संबंधित घटना घडली त्या दिवशी पीडिता आपल्या कामाच्या ठिकाणी जात असताना रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरातील रस्त्यावर आरोपीने तिला अडवले. तिच्या गळ्यात हात घालून तिला ओढत नेत “तू माझ्यावर प्रेम करतेस का नाही” असे म्हणत जबरदस्तीचा प्रयत्न केला. पीडितेने विरोध करून तेथून निघण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने पुन्हा तिचा हात पकडून तिला गाडीवर बसण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला.


दरम्यान, एका अनोळखी व्यक्तीने हस्तक्षेप करून “काय चाललंय?” अशी विचारणा केल्याने आरोपी तेथून पसार झाला. मात्र, जाताना त्याने पीडितेला रात्री काम सुटल्यानंतर पुन्हा येण्याची धमकी दिली होती. या घटनेमुळे घाबरलेल्या पीडितेने तत्काळ आपल्या आईला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली.


प्राथमिक तक्रारीनुसार भारतीय दंड विधान संहिता कलम ३५४(अ) व ३५४(ड) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) कायदा २०१२ अंतर्गत कलम १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पुढे असेही निष्पन्न झाले की आरोपीने यापूर्वी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२१ मध्येही पीडितेचा लैंगिक छळ केला होता. त्यामुळे आरोपीविरुद्ध IPC कलम ३७६(२) तसेच POCSO कायद्यातील कलम ४, ६ आणि १० अंतर्गत अधिक गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले.


सहाय्यक पोलीस निरीक्षक मुक्ता भोसले यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून पुरावे गोळा केले आणि आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. खटल्यादरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण १२ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. विशेष सरकारी वकील सौ. मेघना सुहास नलावडे यांनी प्रभावी युक्तिवाद सादर करत आरोपीविरुद्ध ठोस पुरावे मांडले.


दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून व सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांनी आरोपीला भारतीय दंड विधान संहिता कलम ३५४ तसेच POCSO कायद्याच्या कलम ७ सह ८ अंतर्गत दोषी ठरवले. न्यायालयाने आरोपीस तीन वर्षे सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिन्यांचा साधा कारावास भोगावा लागणार आहे.


तसेच, दंडाच्या रकमेतून ४० हजार रुपये पीडितेला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. कोर्ट पैरवीचे काम राहुल मोहिते यांनी पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *