रत्नागिरी : महावितरण कर्मचाऱ्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न, लॅपटॉपची तोडफोड, कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

banner 468x60

नवीन वीज जोडणी मिळण्यास विलंब होत असल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या एका व्यक्तीने महावितरणच्या जाकादेवी (चाफे) शाखा कार्यालयात अक्षरशः धुडगूस घातल्याची घटना समोर आली आहे. कार्यालयात घुसून कर्मचाऱ्याला शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देत लॅपटॉपची तोडफोड करण्यात आली. एवढ्यावरच न थांबता आरोपीने चाकूने कर्मचाऱ्याच्या पोटावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कर्मचाऱ्याने वेळीच प्रतिकार केल्याने मोठा अनर्थ टळला. २७ नोव्हेंबर रोजी दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र शंकर पवार (वय ४४, रा. जाकादेवी, ता. जि. रत्नागिरी) हे महावितरणच्या जाकादेवी (चाफे) शाखा कार्यालयात कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. आरोपी प्रसाद गजानन देसाई (वय ४१, रा. चिंचवाडी, मांजरे, ता. संगमेश्वर) याचा जाकादेवी येथे आर.ओ. प्लांट आहे. या प्लांटसाठी असलेले पूर्वीचे ४ किलोवॅट वीज कनेक्शन बंद करून नवीन ९ किलोवॅट थ्री-फेज वीज जोडणी मिळावी, यासाठी त्याने २४ नोव्हेंबर रोजी महावितरणच्या शाखा कार्यालयात अर्ज केला होता. मात्र, नवीन वीज जोडणी मिळण्यास विलंब होत असल्याने त्याच्या मनात नाराजी होती.

याच कारणावरून २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.५२ वाजण्याच्या सुमारास आरोपीने राजेंद्र पवार यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. यावेळी त्याने पवार यांना शिवीगाळ केली आणि तुला संपवतो, अशी जीवे मारण्याची धमकी दिली.

त्यानंतर दुपारी ३.४० वाजण्याच्या सुमारास आरोपी प्रसाद देसाई याने थेट महावितरणच्या जाकादेवी (चाफे) शाखा कार्यालयात प्रवेश केला. त्यावेळी पवार हे कार्यालयात कर्तव्यावर होते. आरोपीने त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली आणि जागीच ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर कार्यालयातील लॅपटॉपची तोडफोड करून नुकसान केले.

यानंतर आरोपीने आपल्या मोटारसायकलमधून चाकू काढला आणि राजेंद्र पवार यांच्या पोटावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पवार यांनी प्रसंगावधान राखत प्रतिकार केल्याने चाकूचा वार होण्यापासून ते बचावले. त्यानंतर त्यांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांचा पाठलाग केला. तसेच तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही तुला ठार मारेन, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेनंतर राजेंद्र पवार यांनी जयगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपी प्रसाद गजानन देसाई याच्याविरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक ९४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१), १२१(१), १३२, ३५२, ३५१(२) आणि ३२४(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महावितरणच्या शासकीय कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न आणि कार्यालयातील साहित्याची तोडफोड झाल्याने या घटनेची परिसरात चर्चा सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जयगड पोलीस करीत आहेत.