Breaking News
दापोली : मोबाईल अपडेटच्या मेसेजवर क्लिक करणे पडले महागात, दापोलीतील नोकरदाराला 2 लाख 34 हजारांचा गंडा, सायबर भामट्यांचा नवा डाव, बनावट सॉफ्टवेअर अपडेटच्या माध्यमातून मोबाईल हॅक करून बँक खात्यावर डल्ला रत्नागिरी : कारवांचीवाडीत गादी कारखाना आगीत खाक, सहा लाखांचे नुकसान, बाजूच्‍या जनरल स्टोअर्स दुकानालाही आगीचा फटका दाभोळमध्ये आंबा बागेतील पाण्याच्या खड्ड्यात आढळली मगर, वनविभागाकडून सुरक्षित रेस्क्यू रत्नागिरी : जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम, 30 नोव्हेंबरपर्यंत जनजागृतीचे विविध उपक्रम, बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सरसावले, शाळा, महाविद्यालये आणि गावागावांत जनजागृती रत्नागिरी : जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम, 30 नोव्हेंबरपर्यंत जनजागृतीचे विविध उपक्रम, बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सरसावले, शाळा, महाविद्यालये आणि गावागावांत जनजागृती

दापोली : मोबाईल अपडेटच्या मेसेजवर क्लिक करणे पडले महागात, दापोलीतील नोकरदाराला 2 लाख 34 हजारांचा गंडा, सायबर भामट्यांचा नवा डाव, बनावट सॉफ्टवेअर अपडेटच्या माध्यमातून मोबाईल हॅक करून बँक खात्यावर डल्ला

banner 468x60

मोबाईलमध्ये सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठी आलेल्या मेसेजवर क्लिक करणे दापोली तालुक्यातील एका नोकरदाराला चांगलेच महागात पडले आहे. सॉफ्टवेअर अपडेटच्या नावाखाली आलेल्या संशयास्पद मेसेजवर क्लिक केल्यानंतर मोबाईलमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला आणि त्यानंतर युनियन बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून तब्बल २ लाख ३४ हजार १ रुपयांची रक्कम परस्पर ट्रान्सफर झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात दापोली पोलीस ठाण्यात सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निलेश सूर्यकांत झगडे (वय ४२, व्यवसाय नोकरी, रा. गिम्हवणे तेलीवाडी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ९ जुलै २०२६ रोजी त्यांच्या OnePlus Nord 2T 5G या मोबाईलवर सॉफ्टवेअर अपडेट करण्यासंदर्भात एक मेसेज आला होता. मोबाईलचे सॉफ्टवेअर अपडेट करण्याच्या उद्देशाने त्यांनी त्या मेसेजवर क्लिक केले. मात्र, त्यानंतर त्यांच्या मोबाईलमध्ये अनपेक्षित तांत्रिक समस्या निर्माण होऊ लागल्या.

मेसेजवर क्लिक केल्यानंतर मोबाईल वारंवार गरम होणे, बॅटरी लवकर संपणे अशा समस्या जाणवू लागल्या. त्याचबरोबर मोबाईलमधील गुगल पे ॲपही बंद पडले. त्यामुळे त्यांनी गुगल पे सुरू करून पाहण्याचा प्रयत्न केला; मात्र ते ॲप व्यवस्थित काम करत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. सुरुवातीला हा मोबाईलमधील तांत्रिक बिघाड असल्याचे त्यांना वाटले.

दरम्यान, १० जुलै ते १२ जुलै २०२६ या तीन दिवसांच्या कालावधीत त्यांच्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून वेगवेगळ्या व्यवहारांच्या माध्यमातून पैसे काढण्यात आले. विशेष म्हणजे, या व्यवहारांची माहिती त्यांना तत्काळ लक्षात आली नाही.

त्यानंतर १६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोबाईलमधील गुगल पे ॲप अचानक पुन्हा सुरू झाले. यानंतर त्यांनी गुगल पेच्या माध्यमातून बँक खात्यातील शिल्लक तपासली असता खात्यात केवळ ९०६ रुपये शिल्लक असल्याचे दिसून आले. खात्यातील मोठी रक्कम कमी झाल्याचे पाहून त्यांना धक्का बसला.

त्यानंतर त्यांनी युनियन बँक ऑफ इंडियाकडून आपल्या खात्याचे स्टेटमेंट मिळवले. स्टेटमेंटची तपासणी केली असता १० जुलै ते १२ जुलै या कालावधीत वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शन आयडीच्या माध्यमातून त्यांच्या खात्यातून एकूण २ लाख ३४ हजार १ रुपये परस्पर ट्रान्सफर झाल्याचे समोर आले. आपण कोणतीही परवानगी दिलेली नसताना अज्ञात व्यक्तीने लबाडीच्या उद्देशाने खात्यातील रक्कम ट्रान्सफर करून आर्थिक फसवणूक केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी २७ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजून १६ मिनिटांनी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा रजिस्टर क्रमांक २५८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(२) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६(ड) अन्वये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या सायबर फसवणुकीचा पुढील तपास दापोली पोलीस करीत आहेत.

ऊ

दरम्यान, सॉफ्टवेअर अपडेट किंवा इतर कारण सांगून मोबाईलवर येणाऱ्या अनोळखी लिंकवर क्लिक करणे टाळावे. मोबाईलचे अपडेट नेहमी अधिकृत सेटिंग्जमधूनच करावे. बँक खात्यात संशयास्पद व्यवहार आढळल्यास तातडीने बँकेशी संपर्क साधून सायबर आर्थिक फसवणुकीसाठी १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार नोंदवावी.