दापोली : मजुरी मागितली तर मारण्याची धमकी! साकुर्डेतील चिरेखाणीवर वेठबिगारीचा आरोप, गुन्हा दाखल

banner 468x60

दापोली तालुक्यातील साकुर्डे येथील चिरेखाणीवर मजुरांना मजुरीचे पैसे न देता धमकावून जबरदस्तीने काम करून घेतल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. सप्टेंबर २०२६ पासून २७ नोव्हेंबरपर्यंत मजुरांना वेठीस धरल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरोधात बेकायदेशीर वेठबिगारी आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामचंद्र फुलचंद बनवासी (वय ३६, मूळ रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश) हे साकुर्डे येथील चिरेखाणीवर मजुरीचे काम करत होते. याच ठिकाणी काम करणाऱ्या सुरेश जयराम राठोड (वय ३८, मूळ रा. विजापूर, कर्नाटक) याच्याविरोधात त्यांनी तक्रार दिली आहे.


तक्रारीनुसार, सप्टेंबर २०२६ पासून फिर्यादी आणि साक्षीदारांना त्यांच्या कामाची मजुरी न देता जबरदस्तीने चिरेखाणीवर काम करण्यास भाग पाडण्यात आले. कामाचा हिशोब करून मजुरीचे पैसे द्यावेत आणि आम्हाला आमच्या गावी पाठवावे, अशी मागणी मजुरांनी केली होती. मात्र, या मागणीचा राग धरून आरोपीने त्यांना मारण्याची धमकी दिली आणि जबरदस्तीने काम सुरू ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी रामचंद्र बनवासी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २७ नोव्हेंबर रोजी रात्री ११.११ वाजता दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा रजिस्टर क्रमांक २५९/२०२६ असून, भारतीय न्याय संहितेच्या कलम १४६, ३५१(२) तसेच बंधबिगारी पद्धती (उच्चाटन) अधिनियम १९७६ च्या कलम १६ नुसार सुरेश जयराम राठोड याच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे.


या घटनेमुळे साकुर्डे परिसरातील चिरेखाणींवर काम करणाऱ्या परप्रांतीय मजुरांच्या कामाच्या परिस्थितीचा आणि त्यांच्या हक्कांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मजुरांना मजुरी न देता धमकावून काम करून घेतल्याच्या या आरोपांचा पोलीस तपास करत आहेत.