मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण तालुक्यातील सावर्डे नजीक कोंडमळा येथे शनिवारी (दि. २८ नोव्हेंबर) पहाटे सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास दुचाकी आणि मालवाहू ट्रक यांच्यात अपघात झाला. उताराच्या भागात रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या ट्रकला दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघे तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वालावलकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघातात संगमेश्वर तालुक्यातील ओझरकोंड येथील सूरज डावल (वय २५) आणि ऋतिक गिजे (वय २३) हे जखमी झाले आहेत. दोघेही मुंबईहून आपल्या गावी जाण्यासाठी दुचाकीने प्रवास करत होते. शनिवारी पहाटे त्यांची दुचाकी कोंडमळा येथील उताराच्या भागात आली असता रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या मालवाहू ट्रकला दुचाकीची जोरदार धडक बसली.
धडक एवढी जोरदार होती की दुचाकीचे मोठे नुकसान झाले. या अपघातात दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या दोघांवरही वालावलकर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहने उभी करण्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेषतः उताराच्या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला थांबविलेली वाहने इतर वाहनचालकांसाठी धोकादायक ठरू शकतात. पहाटेच्या वेळी कमी दृश्यमानतेमुळे अशा वाहनांचा अंदाज येण्यास अडचण निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे महामार्गावर अवजड वाहने थांबविताना योग्य खबरदारी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.


या अपघातप्रकरणी जखमी सूरज डावल यांचे काका संजय सखाराम डावल यांनी फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. शनिवारी सायंकाळपर्यंत सावर्डे पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती मिळाली. या अपघाताचा पुढील तपास सावर्डे पोलीस करीत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













