रत्नागिरी : कोतवडे सनगरेवाडीत लग्नघरात मारामारी, महिलांसह सहा जण जखमी

banner 468x60

रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे सनगरेवाडी येथे लग्नसोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या आनंदाच्या वातावरणाला अचानक गालबोट लागले. गल्लीत लाईट लावण्याच्या कारणावरून दोन गटात झालेला किरकोळ वाद काही वेळातच विकोपाला गेला आणि थेट लग्नघरात घुसून तुफान हाणामारी झाल्याची घटना सोमवारी (दि. ११) दुपारी दोनच्या सुमारास घडली. या घटनेत महिलांसह सहा जण जखमी झाले असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, कोतवडे येथील राणे कुटुंबीयांकडे पुढील दोन दिवसांत विवाहसोहळा पार पडणार असल्याने घरात लगबग सुरू होती. घरासमोर मंडप उभारण्यात आला होता तसेच गल्लीत सजावटीसाठी लाईट लावण्याचे काम सुरू होते. याचदरम्यान लाईट लावण्याच्या मुद्द्यावरून दोन गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. सुरुवातीला किरकोळ वाटणारा हा वाद काही क्षणांतच आक्रमक झाला आणि दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकले.

वाद इतका वाढला की काही जण थेट लग्नघरात शिरले आणि एकमेकांवर लाकडी काठ्या तसेच इतर वस्तूंनी हल्ला चढवला. या मारहाणीत महिलांनाही मार बसला. काहींच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून काही जणांना मुका मार लागला आहे. लग्नघरातील महिला व नातेवाईकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला; मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने मोठा गोंधळ उडाला.

या घटनेत प्रसाद गणपत राणे (वय ४३), प्रदीप श्रीकृष्ण राणे (४०), सुजाता संजय करडे (५०), समीक्षा प्रसाद राणे (४०), गणपत लक्ष्मण राणे (७५) आणि सायली दशरथ बारगुडे या सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेनंतर परिसरात काही काळ भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी दोन्ही गटातील संबंधितांची चौकशी सुरू केली असून रात्री उशिरापर्यंत परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

दरम्यान, लग्नाच्या दोन दिवस आधीच घडलेल्या या प्रकारामुळे राणे कुटुंबीयांवर मोठा मानसिक आघात झाला आहे. आनंदाच्या घरात अचानक झालेल्या या राड्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात असून, किरकोळ कारणावरून झालेल्या या हाणामारीची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *