रत्नागिरी : कोल्हापूरहून रत्नागिरीत येणारा प्रतिबंधित गुटखा साठा जप्त, एक आरोपी जेरबंद

banner 468x60

रत्नागिरी शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत कोल्हापूरहून रत्नागिरीत विक्रीसाठी आणला जाणारा प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून तब्बल ६ लाख ७७ हजार ९०४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील अवैध गुटखा तस्करीवर पोलिसांनी चांगलाच आळा घालण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर येथून एक व्यक्ती मोठ्या प्रमाणात गुटखा घेऊन पहाटेच्या सुमारास रत्नागिरीत येणार असल्याची गोपनीय माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने विशेष पथक तयार करण्यात आले. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक महामुनी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी कारवाईचे नियोजन केले.

पोलिसांनी शहरातील प्रमुख मार्गांवर सापळा रचत संशयित वाहनांची तपासणी सुरू केली. दरम्यान, संशयास्पद हालचाल दिसताच इको प्रकारची गाडी अडवून तिची झडती घेण्यात आली. या वेळी गाडीत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला साठवलेला आढळून आला.

या प्रकरणी शरद गणपती भंडारे (रा. सरुड, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३ लाख २७ हजार ९०४ रुपये किमतीचा गुटखा व पान मसाला जप्त करण्यात आला. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली सुमारे ३ लाख ५० हजार रुपये किमतीची इको गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे. अशा प्रकारे एकूण ६ लाख ७७ हजार ९०४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

या कारवाईमुळे रत्नागिरी शहरात अवैधरीत्या गुटखा विक्रीसाठी आणणाऱ्या टोळ्यांना मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, प्रतिबंध असूनही गुटखा तस्करी सुरू असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. पोलिसांकडून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे पुढील तपास करत आहेत. आरोपीकडून आणखी काही महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *