रत्नागिरी : शहरातील भाट्ये–मिऱ्या परिसरात घडलेला एक धक्कादायक सायबर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला असून, एका ७१ वर्षीय सेवानिवृत्त वृद्धाला “जुन्या ५ रुपयांच्या नोटेच्या बदल्यात १५ लाख रुपये मिळवून देतो” असे आमिष दाखवून तब्बल ९ लाख २१ हजार ७०१ रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील अमित चव्हाण या व्यक्तीविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हेमंत मारुती शिवलकर यांनी ऑगस्ट २०२५ दरम्यान फेसबुक रिल्सवर एक आकर्षक जाहिरात पाहिली होती. या जाहिरातीत “५ रुपयांच्या जुन्या नोटेवर ट्रॅक्टरचे चिन्ह असल्यास त्या नोटेसाठी १५ लाख रुपये मिळतील” असा दावा करण्यात आला होता. मोठ्या रकमेच्या या आमिषाला भुलून शिवलकर यांनी जाहिरातीत दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधला.
यानंतर आरोपी अमित चव्हाण याने शिवलकर यांच्याशी संपर्क साधून त्यांचा विश्वास संपादन केला. नोटेची पडताळणी, प्रोसेसिंग फी, जीएसटी, कागदपत्रे व इतर विविध कारणे सांगत आरोपीने वेळोवेळी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये तसेच गुगल पेच्या माध्यमातून पैसे भरण्यास सांगितले. शिवलकर यांनीही टप्प्याटप्प्याने पैसे भरले. अशा प्रकारे ऑगस्ट २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत एकूण ९,२१,७०१ रुपये आरोपीने उकळले.
फसवणुकीचा प्रकार इथेच थांबला नाही. आरोपीने शिवलकर यांच्या बँक खात्यांचा वापर करून इतर नागरिकांचीही फसवणूक केल्याचे समोर आले आहे. इतर लोकांकडून फसवणुकीची रक्कम शिवलकर यांच्या खात्यात जमा करून ती नंतर काढून घेत आरोपीने त्यांची दिशाभूल केली. त्यामुळे शिवलकर यांना आपल्या खात्यातून होणाऱ्या संशयास्पद व्यवहारांची माहितीही बराच काळ मिळाली नाही.
शिवलकर हे वयोवृद्ध असल्याने ते नियमितपणे बँकेत जात नव्हते. त्यामुळे खात्यातील हालचालींकडे त्यांचे लक्ष गेले नाही. मात्र, अलीकडेच बँकेकडून खात्याची सविस्तर माहिती घेतल्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी १४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७:२९ वाजता भारतीय दंड संहिता कलम ३१८(४) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. आरोपीचा शोध घेण्यासाठी तांत्रिक माहिती आणि बँक व्यवहारांचा मागोवा घेतला जात आहे.
दरम्यान, या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, सोशल मीडियावर फिरणाऱ्या अशा भ्रामक जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. विशेषतः “जुन्या नोटा, नाणी, लॉटरी किंवा गुंतवणूक” यांसारख्या आमिषांवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
ही घटना सायबर गुन्हेगार किती चतुराईने आणि योजनाबद्ध पद्धतीने सामान्य नागरिकांना जाळ्यात ओढतात याचे ज्वलंत उदाहरण ठरत आहे. त्यामुळे नागरिकांनी आर्थिक व्यवहार करताना अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













