रत्नागिरी जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी पेट्रोलपंप डिलरशिप मिळवून देण्याचे आमिष दाखवत पाली येथील एका व्यक्तीची तब्बल ६ लाख ३३ हजार ५०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात दोन अज्ञात मोबाईलधारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत तालुक्यातील पाली येथील मनोहर शंकर मेलगे (रा. गवंडेवाडी, खानू-पाली) यांनी दिव्यांग पेट्रोलपंप डिलरशिपसाठी गुगलवर माहिती शोधली होती. त्यानंतर काही दिवसांनी दोन अज्ञात व्यक्तींनी मोबाईलवर संपर्क साधून स्वतःला बीपीसीएल (BPCL) मुंबईचे प्रतिनिधी असल्याचे सांगितले आणि त्यांचा पेट्रोलपंप मंजूर झाल्याचा बनाव केला.
यानंतर संशयितांनी डिलरशिप लायसन्स, एनओसी, पेट्रोल फ्युएल टँक, इनव्हॉइस आदी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विविध बँक खात्यांमध्ये एनईएफटी (NEFT) आणि आरटीजीएस (RTGS) द्वारे पैसे जमा करण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादींनी वेळोवेळी एकूण ६ लाख ३३ हजार ५०० रुपये भरले.
मात्र, दीर्घकाळ उलटल्यानंतरही पेट्रोलपंपाचे काम सुरू न झाल्याने फिर्यादींनी संबंधित मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोन्ही क्रमांक बंद असल्याचे आढळले. त्यानंतर त्यांनी इंटरनेटवरून बीपीसीएल मुंबई कार्यालयाशी संपर्क साधला असता, कंपनीकडून अशा कोणत्याही डिलरशिप प्रक्रियेचा किंवा व्यवहाराचा संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मनोहर मेलगे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी दोन अज्ञात मोबाईलधारकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













