लोकसभा निवडणुकीदरम्यान दिव्यांग मतदारांच्या सोयीसाठी धामणी ग्रामपंचायत इमारतीत आणण्यात आलेल्या व्हीलचेअर गेली दोन वर्षे वापराविना पडून असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या कालावधीत आलेल्या महापुराच्या पाण्यात या व्हीलचेअर बुडाल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर आले आहे. दिव्यांगांच्या सुविधांकडे झालेल्या या दुर्लक्षाबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
नुकत्याच तुरळ ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या कडवई प्रभाग समितीच्या बैठकीत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास पेंडसे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर प्रभाग समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे याबाबत जाब विचारला.
लोकसभा निवडणुकीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या या व्हीलचेअर निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दिव्यांगांच्या वापरासाठी का देण्यात आल्या नाहीत, असा प्रश्न बैठकीत उपस्थित करण्यात आला. त्यानंतर विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकादेखील पार पडल्या; मात्र या व्हीलचेअर अद्याप ग्रामपंचायत इमारतीतच पडून असल्याचे निदर्शनास आले.
सलग दोन वर्षे महापुराच्या पाण्यात बुडाल्यामुळे या व्हीलचेअरची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. दिव्यांगांच्या सुविधांसाठी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या साहित्याची अशी दुर्दशा झाल्याने दिव्यांगांची थट्टा झाल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
या व्हीलचेअरची जबाबदारी नेमकी कोणाची — गटविकास अधिकारी कार्यालयाची की निवडणूक विभागाची — यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. तसेच या प्रकरणात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडेही नागरिकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी तसेच दिव्यांगांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या सुविधांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













