रत्नागिरी तालुक्यातील देवूड लावगण देसाईवाडी येथे आजारपणाच्या त्रासातून ३६ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मानसी महेश देसाई असे मृत विवाहितेचे नाव आहे. मंगळवारी रात्री उशिरा ही घटना उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मानसी देसाई यांना शरीरातील प्रथिनांची कमतरता आणि त्यामुळे होणाऱ्या सूजेचा त्रास होता. त्यांच्यावर यापूर्वी रत्नागिरीतील दोन खासगी रुग्णालयांत उपचार करण्यात आले होते. पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथील सूर्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. ७ नोव्हेंबर रोजी त्यांचे पती उपचारानंतर त्यांना पुन्हा घरी घेऊन आले होते.
मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्यांचे पती गावातील मंदिरातील उत्सव आटोपून घरी परतले. घराची कडी उघडून आत प्रवेश केल्यानंतर त्यांनी पत्नीला हाक मारली. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने घरात शोध घेतला असता, घराच्या मागील बाजूस असलेल्या पडवीत मानसी यांनी गळफास घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
त्यानंतर पती व नातेवाइकांनी त्यांना तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून रात्री पावणेअकराच्या सुमारास त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













