मुसळधार पावसामुळे राजापूर तालुक्यातील अर्जुना आणि कोदवली नद्यांना मोठा पूर आला आहे. रविवारी सकाळी पुराचे पाणी थेट शहरातील जवाहर चौकात शिरल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक प्रमुख मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे.
पुराचे पाणी जवाहर चौकात आल्यामुळे येथील एसटी बस वाहतूक बंद करण्यात आली आहे. चौकातील व्यावसायिकांच्या टपऱ्या पाण्याखाली गेल्या असून व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तसेच राजापूर–शिळ–गोठणे-दोनिवडे मार्गावर अर्जुना नदीच्या पुराचे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. शहरातील बंदरधक्का आणि गणेशघाट परिसर देखील पाण्याखाली गेल्याने तेथील वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातही मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरे, गोठे आणि झाडांची पडझड झाली असून विविध भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. अतिवृष्टीमुळे कशेळी देवघळी बीच सनसेट पॉईंट पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे.
पुराचा धोका लक्षात घेऊन नदीकाठावरील व्यापारी आणि नागरिकांनी शनिवारीच आपल्या सामानाची सुरक्षित ठिकाणी हलविण्याची तयारी केल्याने मोठे आर्थिक नुकसान टळल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, नाटे बाणेवाडी येथे भागीरथी काशिनाथ चव्हाण यांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळून मोठे नुकसान झाले असून पोकळेवाडीकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. कातळी गावात अ. रहीम अ. लतिफ सोलकर यांच्या घरावर पिंपळाचे झाड पडल्याने घराचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
याशिवाय राजापूर–गोठणे–दोनिवडे–सौंदळ मार्गावर पुराचे पाणी आल्याने हा मार्गही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
पन्हाळे तर्फे राजापूर बौद्धवाडी येथे वीजवाहिनी तुटून पडल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.
राजापूर शहरात निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी नदीकाठ, पूरग्रस्त भाग आणि बंद करण्यात आलेल्या रस्त्यांवर जाणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













