राजापूर-संगमेश्वरात हॉटेल रजिस्टर चोरी प्रकरण : संशयितांची गाडी जप्त, सात मोबाईल आणि नऊ रजिस्टर पोलिसांच्या ताब्यात, ‘कर्नाटक गँग’चा पर्दाफाश

banner 468x60

राजापूर आणि संगमेश्वर तालुक्यातील हॉटेलमध्ये ग्राहक नोंदणी रजिस्टर चोरी करून पलायन करणाऱ्या चार संशयित आरोपींविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत त्यांची गाडी जप्त केली आहे. या गाडीतून सात मोबाईल फोन, नऊ हॉटेल व लॉजिंगची नोंदणी रजिस्टर तसेच अन्य साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे. आरोपी हे कर्नाटक राज्यातील असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

banner 728x90

सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास राजापुरातील हॉटेल फुडलॅन्ड येथे चार संशयित आरोपी रूम पाहण्याच्या बहाण्याने आले होते. हॉटेल कर्मचाऱ्यांचे लक्ष विचलित करून त्यांनी ग्राहक नोंदणी रजिस्टर उचलले आणि काही क्षणातच तेथून पसार झाले. ही बाब लक्षात येताच हॉटेल व्यवस्थापनाने तात्काळ राजापूर पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींचा शोध सुरू केला.

दरम्यान, याच दिवशी संगमेश्वर तालुक्यातील हॉटेल श्रद्धा येथेही याच पद्धतीने चोरीची घटना घडली. चार संशयितांनी तेथील ग्राहक नोंदणी रजिस्टर घेऊन पलायन केले. संशयितांची कार्यपद्धती एकसारखी असल्याने दोन्ही घटना एकाच टोळीने घडवून आणल्याचा पोलिसांना संशय आहे. संगमेश्वर पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी माहिती मिळताच तात्काळ नाकाबंदीचे आदेश दिले.

संपूर्ण परिसरात पोलिसांची नाकाबंदी सुरू असल्याचे लक्षात येताच आरोपींनी वापरलेली निळ्या रंगाची हुंडाई कार (क्र. KO 51 MG 6905) महामार्गावरील तुरळ परिसरात सोडून पलायन केले. सावर्डा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक आबासो पाटील यांनी तत्काळ कार ताब्यात घेतली. नंतर ही कार तपासासाठी जप्त करण्यात आली.

गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये सात मोबाईल फोन आणि नऊ हॉटेल व लॉजिंगची ग्राहक नोंदणी रजिस्टर आढळून आली. या मोबाईलमध्ये सहा अँड्रॉईड मोबाईल, दोन साधे मोबाईल तसेच एक आयफोन असल्याचे पोलिसांनी सांगितले. विशेष म्हणजे या सर्व मोबाईलमधील सीमकार्ड कर्नाटक राज्यातील असल्याचे उघड झाले आहे. त्यावरून आरोपी कर्नाटकातील असल्याचा संशय अधिक बळावला आहे.

या टोळीने राजापुरातील हॉटेल फुडलॅन्ड येथून सुमारे सहा हजार रुपये रोख रक्कम चोरल्याचे समोर आले आहे. तसेच संगमेश्वर येथील एका हॉटेलमधून साडेपाच हजार रुपये लांबविण्यात आले आहेत. संबंधित हॉटेल मालकांच्या तक्रारीवरून राजापूर आणि संगमेश्वर पोलिसांनी चारही संशयितांविरोधात चोरीचे गुन्हे दाखल केले आहेत.

राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी सांगितले की, आरोपींचा शोध घेण्यासाठी कर्नाटक पोलिसांशी संपर्क साधण्यात आला असून विविध तांत्रिक माध्यमांतून तपास सुरू आहे. जप्त मोबाईल आणि सीमकार्डच्या आधारे आरोपींचा माग काढला जात आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात यश येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोबीन शेख करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *