ग्रामीण भागातील ज्वलंत प्रश्नांना आपल्या लेखणीच्या माध्यमातून वाचा फोडत, सामाजिक समस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले युवा पत्रकार तथा ग्रामीण वार्ता डिजिटल मीडियाचे संपादक मुझम्मील काझी यांना दोन राज्यस्तरीय ‘समाज रत्न’ पुरस्कार जाहीर झाले आहेत. ग्रामीण पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्न मांडत केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना हे सन्मान जाहीर करण्यात आले आहेत.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या, अन्याय, प्रशासकीय अडचणी आणि जनहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी मुझम्मील काझी यांनी डिजिटल पत्रकारितेचा माध्यम म्हणून उपयोग केला. ग्रामीण वार्ता डिजिटल मीडियाची सुरुवात करून ग्रामीण भागातील प्रश्नांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्या पत्रकारितेतून अनेक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचले असून, विविध समस्यांच्या निराकरणासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना आजवर नऊ वेळा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
याच कार्याची दखल घेत ‘वर्ल्ड फॉर नेचर इंडिया’, रत्नागिरी जिल्हा शाखेच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. संस्थेच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘निसर्ग मित्र मेळावा व दुसरा राज्यस्तरीय सन्मान सोहळा २०२६’ या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
दरम्यान, मंथन फाऊंडेशन, कपिलेश्वर यांच्या वतीनेही मुझम्मील काझी यांना राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ५ डिसेंबर रोजी कोल्हापूर येथे आयोजित सन्मान सोहळ्यात त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातील प्रश्नांना प्राधान्य देत लोकहिताची पत्रकारिता करण्याच्या त्यांच्या वाटचालीला दोन राज्यस्तरीय पुरस्कारांच्या घोषणेने नवी प्रेरणा मिळाली असून, त्यांच्या या यशाबद्दल पत्रकारिता क्षेत्रातून आणि विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













