राजापूर तालुक्यातील विलये-मिराशीवाडी येथे सामाईक जमिनीच्या वापरावरून दोन भावांच्या कुटुंबांमध्ये वाद होऊन त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. या घटनेत दोन्ही बाजूंनी एकमेकांवर कोयतीने मारहाण केल्याचे आरोप करण्यात आले असून, याप्रकरणी राजापूर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुहासिनी सुरेश तावडे (वय ६०) यांनी राजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्या त्यांचे पती सुरेश तावडे यांच्यासोबत घरी जात असताना घरालगतच्या सामाईक जमिनीतील बागेत नामदेव धोंडू तावडे हे साफसफाई करत असल्याचे दिसून आले. यावेळी सामाईक जमिनीचा वापर करण्याच्या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला.
या वादातून नामदेव तावडे यांनी हातातील कोयतीने सुहासिनी तावडे यांच्या पाठीवर तसेच उजव्या खांद्यावर मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या मारहाणीत सुहासिनी तावडे जखमी झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेप्रकरणी नामदेव धोंडू तावडे यांनीही राजापूर पोलिसांत स्वतंत्र तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, ते सामाईक जागेतील बागेची साफसफाई करून घरी परतत असताना सुहासिनी तावडे आणि सुरेश तावडे यांनी त्यांना शिवीगाळ केली.
त्यानंतर दोघांनी आपल्याला कोयतीने मारहाण केली तसेच खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप नामदेव तावडे यांनी केला आहे.
सामाईक जमिनीच्या वापरावरून सुरू झालेल्या वादाने काही वेळातच मारामारीचे स्वरूप घेतल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणात दोन्ही कुटुंबांकडून परस्परविरोधी आरोप करण्यात आले असून, नेमकी घटना कशी घडली, याबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
राजापूर पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारी दाखल करून घेतल्या असून, घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













