दापोली शहरातील मध्यवर्ती आणि नागरिकांसाठी महत्त्वाचे असलेले आझाद मैदान सध्या भटक्या व आक्रमक कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे चर्चेत आले आहे. मैदान परिसरात कुत्र्यांची संख्या वाढल्याने शाळकरी मुले, खेळाडू तसेच सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

आझाद मैदानावर सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी आणि खेळाडू येत असतात. परिसरात शाळा असल्याने शाळकरी मुलांचीही या भागातून मोठ्या प्रमाणात ये-जा असते. मात्र, मैदान परिसरात भटक्या कुत्र्यांचे कळप फिरताना दिसत असून, काही कुत्रे आक्रमकपणे नागरिकांचा पाठलाग करत असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून करण्यात येत आहेत.

विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही परिस्थिती चिंतेची ठरत आहे. कुत्र्यांचा अचानक पाठलाग सुरू झाल्यास घाबरून मुले किंवा ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर धावण्याची शक्यता असून, त्यामुळे अपघाताचा धोकाही निर्माण होऊ शकतो. मैदानावर सरावासाठी येणाऱ्या खेळाडूंनाही या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत या परिसरात विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. त्यामुळे भविष्यात कुत्र्यांकडून एखादी दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
दापोली नगरपंचायत व संबंधित प्रशासनाने आझाद मैदान परिसरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी दापोलीतील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













