राजापूर तालुक्यातील कशेळी येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या निर्घृण खून प्रकरणात मुख्य आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याला न्यायालयाने पुन्हा एकदा दिलासा नाकारला आहे. वैद्यकीय कारणावर आधारित दाखल करण्यात आलेला त्याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावत उपचार पोलीस देखरेखीखाली घेण्याचे निर्देश दिले.
या प्रकरणात शशिकांत वारिशे यांचा थार गाडीखाली चिरडून खून केल्याचा आरोप आंबेरकरवर आहे. या घटनेनंतर राजापूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. ७ फेब्रुवारी २०२३ रोजी आंबेरकरला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तो न्यायालयीन कोठडीत आहे.
दरम्यान, आंबेरकरने यापूर्वीही अनेक वेळा जामीनासाठी प्रयत्न केले होते. त्यापैकी तीन अर्ज न्यायालयाने फेटाळले होते. मात्र, जानेवारी २०२६ मध्ये वैद्यकीय कारणास्तव दाखल केलेल्या अर्जावर सहानुभूतीने विचार करत न्यायालयाने त्याला सहा आठवड्यांचा अल्पकालीन जामीन मंजूर केला होता.
हा कालावधी संपल्यानंतर आंबेरकर पुन्हा कारागृहात हजर झाला. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा जामिनासाठी अर्ज करत स्वतःला तीव्र उच्च रक्तदाब, मधुमेह, तसेच मज्जातंतूंवर परिणाम होणाऱ्या समस्यांनी त्रस्त असल्याचे सांगितले. त्यासोबतच वैद्यकीय तपासणीत किडनी स्टोन आणि पित्ताशयातील खडे आढळल्याचे नमूद करण्यात आले. पुढील उपचारासाठी युरोलॉजिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट आणि कार्डिओलॉजिस्ट यांची आवश्यकता असून रत्नागिरीत या सुविधा अपुऱ्या असल्याचा दावा बचाव पक्षाने केला.
आरोपीला किडनी, पित्ताशय, प्रोस्टेट आणि गुदद्वाराशी संबंधित शस्त्रक्रिया करावी लागू शकते, त्यामुळे मुंबईत खासगी रुग्णालयात उपचारासाठी चार महिन्यांचा जामीन मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच मागील जामिनाच्या सर्व अटींचे पालन केल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
मात्र, सरकार पक्षाने या मागणीस जोरदार विरोध केला. आरोपीवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून त्याचा गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. तो साक्षीदारांवर दबाव टाकण्याची किंवा फरार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सांगण्यात आले. तसेच आवश्यक वैद्यकीय उपचार पोलीस बंदोबस्तात उपलब्ध करून देता येतील, असेही स्पष्ट करण्यात आले.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि सादर केलेले वैद्यकीय अहवाल विचारात घेतल्यानंतर न्यायालयाने आंबेरकरचा जामीन अर्ज फेटाळून लावला. सध्या उपलब्ध वैद्यकीय स्थितीत तातडीने जामीन देण्याची आवश्यकता नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. मात्र, भविष्यात गंभीर वैद्यकीय गरज भासल्यास आरोपीला पोलीस देखरेखीखाली खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्याची मुभा असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
या निर्णयामुळे खून प्रकरणातील सुनावणीदरम्यान आरोपीला पुन्हा एकदा कोठडीतच राहावे लागणार असून, प्रकरणातील पुढील न्यायालयीन प्रक्रिया अधिक महत्त्वाची ठरणार आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*














