Breaking News
संगमेश्वर : शेतात काम करताना कुऱ्हाडीचा घाव लागल्याने वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू, संगमेश्वर तालुक्यातील हरपुडे येथील घटना दाभोळ : ओणी-बौद्धवाडी फाट्यावर डंपर उभा करून वाहतुकीस अडथळा, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल खेड : रामदास कदम यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी, इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलचं अपक्रम, शिबिर उत्साहात संपन्न राजापूरात दोन एसटी बसची समोरासमोर धडक, चालकांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली राजापूर : अनुस्कुरा घाटात मध्यरात्री दरड कोसळून वाहतूक ठप्प, पोलिसांच्या तत्परतेने दोन तासांत मार्ग मोकळा, सार्वजनिक बांधकाम विभागावर संताप

राजापूर : अनुस्कुरा घाटात मध्यरात्री दरड कोसळून वाहतूक ठप्प, पोलिसांच्या तत्परतेने दोन तासांत मार्ग मोकळा, सार्वजनिक बांधकाम विभागावर संताप

banner 468x60

राजापूर तालुक्यातील अनुस्कुरा घाटात मंगळवारच्या मध्यरात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास मोठी दरड कोसळल्याने या घाटमार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. दरड रस्त्यावर कोसळल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अनेक प्रवासी तसेच बुधवारी बाजारासाठी भाजीपाला घेऊन जाणारे विक्रेते रस्त्यात अडकून पडले. मात्र, घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. पोलिसांच्या तत्परतेमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला आणि तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास या मार्गावरील एकेरी वाहतूक सुरू करण्यात यश आले.

banner 728x90

मुसळधार पावसामुळे अनुस्कुरा घाटातील डोंगरकडा खचून मोठ्या प्रमाणात माती, दगड आणि झाडे रस्त्यावर कोसळली. त्यामुळे घाटमार्ग पूर्णपणे बंद झाला. रात्रीची वेळ असल्याने आणि परिसरात अंधार असल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली होती. दरड कोसळल्यामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प राहिली आणि वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासोबत पोलीस कर्मचारी अमर मोरे, रामदास पाटील, स्वप्निल घाटगे, अर्शद मुल्ला आणि जाधव यांनीही मदतकार्यात सहभाग घेतला. यावेळी रस्त्यात अडकलेल्या प्रवाशांसह बुधवारी बाजारासाठी भाजीपाला घेऊन जाणाऱ्या भाजी विक्रेत्यांनीही पोलिसांना सहकार्य केले. सर्वांनी मिळून रस्त्यावर पडलेले दगड, माती आणि झाडांचा मलबा बाजूला करण्याचे काम हाती घेतले.

सलग दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर पहाटे तीनच्या सुमारास रस्ता अंशतः मोकळा करण्यात आला आणि एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. त्यामुळे अडकलेल्या वाहनांना मार्ग मिळाला आणि प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. पोलिसांच्या समयसूचकतेचे आणि तत्परतेचे नागरिकांनी कौतुक केले.

दरम्यान, अनुस्कुरा घाटात दरवर्षी पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. असे असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुरेशी प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जात नसल्याची नाराजी स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. पावसाळ्यापूर्वी घाट परिसरातील धोकादायक झाडेझुडपे छाटणे, तुंबलेली गटारे साफ करणे, दरडप्रवण भागांची पाहणी करून आवश्यक ती सुरक्षा उपाययोजना करणे गरजेचे असतानाही याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

विशेष म्हणजे, मध्यरात्री एवढी मोठी घटना घडल्यानंतर पोलीस यंत्रणा तत्काळ मदतीला धावून आली; मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी वेळेत घटनास्थळी न पोहोचल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अनुस्कुरा घाटातील धोकादायक भागांचे तातडीने सर्वेक्षण करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, तसेच पावसाळ्यापूर्वी आवश्यक देखभाल आणि सुरक्षा कामे नियमितपणे करण्यात यावीत, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि प्रवाशांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *