चिपळूणमध्ये 8 वर्षांच्या मुलावरील अत्याचार प्रकरणी आरोपीला जन्मठेप, विशेष न्यायालयाचा कठोर निर्णय

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील एका गावात आठ वर्षांच्या अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला चिपळूण येथील विशेष न्यायालयाने जन्मठेप आणि ₹१० हजार दंडाची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयामुळे पीडित बालकाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत असून बाल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांविरोधात कठोर संदेश समाजात गेला आहे.

banner 728x90

या प्रकरणातील आरोपीचे नाव फईम अब्दुल्ला तांबे (रा. चिपळूण) असे आहे. न्यायालयाने त्याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून, दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्यांची सक्त मजुरी भोगावी लागणार आहे.

प्रकरणातील माहितीनुसार, ९ जानेवारी २०१९ रोजी सायंकाळी आठ वर्षांचा पीडित मुलगा मित्राची वाट पाहत असताना आरोपीने त्याचे तोंड व हात रुमालाने बांधले आणि त्याला शेतात नेऊन अनैसर्गिक अत्याचार केला. या घटनेची कुणालाही माहिती दिल्यास जीवे मारण्याची धमकीही आरोपीने मुलाला दिली होती.

यानंतर ११ जानेवारी २०१९ रोजी पीडित मुलगा मित्रांसोबत खेळत असताना आरोपीने त्याला जवळच सुरू असलेल्या एका इमारतीत नेले आणि पुन्हा त्याच्यावर अत्याचार केला. ही बाब पीडित मुलाच्या मित्राच्या लक्षात आल्यानंतर त्याने नातेवाईकांना माहिती दिली. त्यानंतर चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली आणि त्याच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यासह संबंधित कलमांन्वये कारवाई केली.

या प्रकरणाचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक बी. आय. नाईकवाडे यांनी केला. तर न्यायालयीन कामकाजात पोलीस उपनिरीक्षक विनायक चव्हाण यांनी पैरवी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील प्रफुल्ल साळवी यांनी प्रभावी युक्तिवाद केला. या खटल्यात एकूण १२ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. त्यामध्ये पीडित बालक आणि त्याच्या मित्रांची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली.

सर्व पुरावे, साक्षी आणि युक्तिवादांचा विचार करून विशेष न्यायाधीश डी. बी. म्हालटकर यांनी आरोपी फईम अब्दुल्ला तांबे याला दोषी ठरवत जन्मठेप आणि ₹१० हजार दंडाची शिक्षा सुनावली.

विशेष म्हणजे, जुलै २०२६ या एकाच महिन्यात चिपळूण सत्र न्यायालयाने सुनावलेली ही दुसरी जन्मठेपेची शिक्षा असून, बाल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांबाबत न्यायालय कठोर भूमिका घेत असल्याचे या निकालातून पुन्हा अधोरेखित झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *