राजापूर तालुक्यातील नाणार येथील इंगळवाडी परिसरात खाडीपात्रात बुडून एकाच कुटुंबातील चार भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी, ११ ऑक्टोबर रोजी घडली. या दुर्घटनेत एका मुलीला वाचवण्यात यश आले असून, तिघांचे मृतदेह शोधमोहिमेदरम्यान बाहेर काढण्यात आले आहेत. तर चौथ्या मुलीचा शोध सुरू होता. या घटनेमुळे नाणार पंचक्रोशीसह संपूर्ण राजापूर तालुक्यात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाणार येथील इंगळवाडी परिसरात राहणारे जुनेद भाटकर आणि त्यांच्या पत्नी हिना भाटकर हे रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास आपल्या पाच मुलांसह गावातील खाडीपात्रात कालवे आणि मुळे काढण्यासाठी गेले होते. आई-वडील खाडीत कालवे काढण्याच्या कामात व्यस्त असताना, सायंकाळी साडेचारच्या सुमारास पाचही मुले पाण्यात गेली. खाडीपात्रातील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
मुले पाण्यात बुडू लागल्याचे लक्षात येताच त्यांना वाचवण्यासाठी कुटुंबीयांनी प्रयत्न केले. या प्रयत्नांत एका लहान मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र, अन्य चार भावंडे खोल पाण्यात बुडाली.
या दुर्घटनेत मोहम्मद जुनेद भाटकर (वय ६), जुहेरिया जुनेद भाटकर (वय ९), बुशिरा जुनेद भाटकर (वय ११) आणि माहिरा जुनेद भाटकर (वय १५) या चार भावंडांचा दुर्दैवी अंत झाल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच नाटे सागरी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थ व मच्छीमारांच्या मदतीने खाडीपात्रात शोधमोहीम हाती घेण्यात आली. या शोधमोहिमेदरम्यान मोहम्मद, जुहेरिया आणि बुशिरा या तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर माहिरा हिचा शोध सायंकाळपर्यंत सुरू होता.
एकाच कुटुंबातील चार निष्पाप मुलांवर काळाने घाला घातल्याने भाटकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे. खाडीपात्रातील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने घडलेल्या या दुर्घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे.
दरम्यान, चौथ्या मुलीचा शोध सुरू असल्याची माहिती मिळाली असून, तिच्याबाबतची पुढील अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













