चिपळूण : गोवळकोट धक्का येथे मान्सूनपूर्व ‘मॉक ड्रिल’; आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची सज्जता तपासली

banner 468x60

मान्सून काळात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तींचा सामना करण्यासाठी प्रशासन किती सज्ज आहे, याची चाचपणी करण्यासाठी गोवळकोट धक्का येथे गुरुवारी मान्सूनपूर्व ‘मॉक ड्रिल’ अर्थात रंगीत तालीम घेण्यात आली. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या निर्देशानुसार आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात विविध विभागांनी तत्परतेने सहभाग नोंदवला.

banner 728x90

मॉक ड्रिलदरम्यान गोवळकोट धक्का परिसरात एक व्यक्ती पाण्यात बुडाल्याची माहिती तहसीलदार कार्यालय आणि नगरपालिकेच्या नियंत्रण कक्षामार्फत संबंधित विभागांना देण्यात आली. हा संदेश मिळताच महसूल, आरोग्य, पोलीस, अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित यंत्रणा अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाल्या.

सर्व अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर ही प्रत्यक्ष दुर्घटना नसून मान्सूनपूर्व तयारीचा भाग म्हणून आयोजित करण्यात आलेली रंगीत तालीम असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यानंतर उपस्थितांना आपत्ती व्यवस्थापनासंदर्भातील विविध उपाययोजनांची माहिती देण्यात आली.

यामध्ये बचाव बोटीचा वापर, लाईफ जॅकेटचे महत्त्व, बुडालेल्या व्यक्तीला पाण्यातून बाहेर काढल्यानंतर देण्यात येणारे प्रथमोपचार तसेच पूर व अतिवृष्टीच्या काळात घ्यावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या तालमीत तहसीलदार कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय, चिपळूण नगरपरिषदेचे अग्निशमन दल, रेस्क्यू बोट पथक, तालुका आरोग्य विभाग, पोलीस विभाग, ग्राम महसूल अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच ‘आपदा मित्र’ स्वयंसेवक सहभागी झाले होते.

यावेळी तहसीलदार प्रविण लोकरे यांनी, “मान्सूनच्या काळात कोणतीही आपत्ती उद्भवल्यास प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे,” असे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *