दाभोळ : भिवबंदर येथे बाळासाहेब सावंत विद्यालयातर्फे 90 झाडांचे वृक्षारोपण

banner 468x60

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत दापोली तालुक्यातील मा. बाळासाहेब सावंत विद्यालय, दापोली यांच्या माध्यमातून मौजे भिवबंदर येथे वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. इंगळे व देसाई यांच्या संकल्पनेतून सार्वजनिक ओसाड जागा तसेच स्मशानभूमी परिसरातील मोकळ्या जागेत दि. २८ व २९ नोव्हेंबर २०२५ रोजी एकूण ९० झाडांची लागवड करण्यात आली.

या उपक्रमात विद्यालयातील रोपे अंकुरित प्रशिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. तसेच भिवबंदर येथील ग्रामस्थांनीही मोठ्या उत्साहाने उपस्थित राहून वृक्षारोपण मोहिमेला सहकार्य केले.

विद्यालयातील ९० विद्यार्थिनींना लावलेल्या प्रत्येक झाडाची विशेष काळजी घेणे, त्यांचे संगोपन व संरक्षण करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी आंबा, काजू, फणस, जांभूळ, नारळ, चिंच, सीताफळ यांसह विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली असून, त्यांच्या संवर्धनाची जबाबदारीही घेण्यात आली.

या उपक्रमामुळे भिवबंदर परिसरातील जैवविविधतेच्या जतनास मोठी मदत होणार असून, भविष्यात याचा लाभ शेतकरी व ग्रामस्थांना होणार आहे. विद्यार्थ्यांनी गाव, वाडी आणि वस्त्यांमध्ये अशा प्रकारचे पर्यावरणपूरक उपक्रम सातत्याने राबवावेत, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

या सामाजिक व पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमाबद्दल मा. बाळासाहेब सावंत विद्यालय, दापोली, विद्यालयाचे मुख्याध्यापक भोसले सर तसेच सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे भिवबंदर ग्रामस्थांनी मनःपूर्वक आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *