दापोली : आंबे देण्याच्या कारणावरून वृद्ध आत्याला मारहाण; भाच्याकडून जीवे मारण्याची धमकी

banner 468x60

दापोली तालुक्यातील बुरोंडी बाजारपेठ परिसरात कौटुंबिक वादातून एका वृद्ध महिलेला तिच्याच भाच्याकडून अमानुष मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. आंबे देण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या या वादाने हिंसक वळण घेतल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, पीडित महिला गंभीर आजाराने त्रस्त असल्याची माहिती आरोपीला असूनही त्याने त्यांच्यावर निर्दयीपणे हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, कल्पना एकनाथ काजारी (वय ७२) या बुरोंडी बाजारपेठ परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांना ब्रेन ट्यूमरचा गंभीर आजार असून त्या उपचार घेत आहेत.संशयित आरोपी केतन कमळाकर केळसकर (वय ३२) हा त्यांचा सख्खा भाचा असून दोघांची घरे शेजारीच आहेत.

दिनांक ४ मे रोजी दुपारी सुमारे ३.३० वाजण्याच्या सुमारास आंबे देण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर हा वाद अचानक चिघळला. संशयित केतन याने संतापाच्या भरात आपल्या वृद्ध आत्याला जोरात ढकलून दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्या खाली पडता पडता बचावल्या. त्यानंतर आरोपीने शिवीगाळ करत त्यांच्या डोक्यावर, डोळ्यावर आणि तोंडावर हाताने जबर मारहाण केली.

या मारहाणीत कल्पना काजारी या जखमी झाल्या. त्यांना आधीपासून गंभीर आजार असल्याने या घटनेमुळे त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. परिसरातील नागरिकांनीही या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, सुरू असलेली मारहाण थांबवण्यासाठी कल्पना काजारी यांची मुलगी पूजा चव्हाण घटनास्थळी धावून आली. मात्र, आरोपीने तिलाही शिवीगाळ करत “तुम्हा दोघींना जीवे ठार मारीन,” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पीडित कुटुंब भयभीत झाले आहे.

घटनेनंतर कल्पना काजारी यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार पोलिसांनी संशयित केतन कमळाकर केळसकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत मारहाण, दुखापत करणे, शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

दापोली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपीविरोधात पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *