खेडमध्ये ‘नमो दहीहंडी उत्सव 2026’; विजेत्या गोविंदा पथकाला 1 लाख 11 हजारांचे पारितोषिक

banner 468x60

खेडमध्ये भारतीय जनता पार्टी व राजवैभव प्रतिष्ठान, खेड यांच्या वतीने यंदा ‘नमो दहीहंडी उत्सव २०२६’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता या उत्सवाला सुरुवात होणार आहे. गोविंदा पथकांसाठी आकर्षक रोख पारितोषिके, मानाची गदा, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात येणार असल्याने यंदाच्या दहीहंडी उत्सवाची उत्सुकता वाढली आहे.

या स्पर्धेतील विजेत्या गोविंदा पथकाला तब्बल १ लाख ११ हजार १११ रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय थरांनुसार स्वतंत्र रोख पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे. ८ थरांसाठी १० हजार, ७ थरांसाठी ८ हजार, ६ थरांसाठी ७ हजार आणि ५ थरांसाठी ५ हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.

उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सहभागी होणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाला रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. त्यामुळे विविध भागांतील गोविंदा पथकांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे.

दहीहंडी उत्सवासोबतच ‘नमो श्री’ भव्य शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मुंबईतील नामवंत कलाकारांचा नृत्याविष्कारही कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरणार आहे. त्यामुळे दहीहंडी, शरीरसौष्ठव स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी खेडवासीयांना अनुभवता येणार आहे.

भारतीय जनता पार्टी व राजवैभव प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उत्सवाच्या आयोजनासाठी सक्रिय असून, खेड परिसरातील नागरिकांनी तसेच गोविंदा पथकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ‘नमो दहीहंडी उत्सव २०२६’चा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *