रत्नागिरी : दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, तातडीने पंचनामे करण्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांचे आदेश

banner 468x60

राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही, अशी ग्वाही आमदार तथा राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात येणार असून, शेतकऱ्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठवाड्यासह राज्यातील विविध भागांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीबाबत बोलताना योगेश कदम यांनी शेतकऱ्यांनी कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन केले. पुढील ८ ते ९ महिन्यांसाठी पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आणि इतर आवश्यक बाबींचे नियोजन शासनाकडून करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कदम म्हणाले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली आहे. केवळ तातडीची आर्थिक मदत देऊन प्रश्न सुटणार नसून, पुढील काही महिन्यांचा विचार करून दुष्काळ निवारणाचे नियोजन करणे आवश्यक आहे. अल निनोच्या प्रभावामुळे पावसावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनाने पूर्वतयारी केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

केवळ पावसाची आकडेवारी पाहून दुष्काळ ठरणार नाही

दुष्काळ निश्चित करताना केवळ एकूण पावसाची मिलिमीटरमधील आकडेवारी ग्राह्य धरली जाणार नसल्याचे कदम यांनी स्पष्ट केले. एखाद्या भागात सरासरी पाऊस काही दिवसांत मोठ्या प्रमाणात झाला आणि त्यानंतर सलग दोन-तीन महिने पाऊस झाला नाही, तर त्या भागातील प्रत्यक्ष परिस्थिती लक्षात घेणे गरजेचे आहे.

त्यामुळे पावसाचे प्रमाण, पिकांची स्थिती आणि प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थितीचा आढावा घेऊन दुष्काळसदृश भाग निश्चित केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

रत्नागिरीतील तालुक्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा

रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, राजापूर आणि संगमेश्वर यांसह ज्या-ज्या तालुक्यांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या भागांचा दुष्काळग्रस्त क्षेत्रात समावेश करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याचे योगेश कदम यांनी सांगितले.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली असून, बाधित पिकांचे तातडीने पंचनामे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पुढील ५-६ दिवस महत्त्वाचे

पुढील ५ ते ६ दिवसांत परतीचा पाऊस झाला नाही, तर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या नियमांनुसार मदत आणि भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांनी संकटाच्या काळात संयम राखावा आणि कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *