मंडणगड : चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवकाची गळफास घेऊन आत्महत्या, किल्ले मंडणगड येथे मृतदेह आढळला

banner 468x60

मंडणगड तालुक्यातील पालघर येथील निखिल रवींद्र पडवळकर (वय २९) या युवकाचा मृतदेह किल्ले मंडणगड परिसरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. निखिल १७ जूनपासून बेपत्ता होता. शनिवारी (२० जून) त्याचा मृतदेह दर्ग्याशेजारील बोरीच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

banner 728x90

निखिल पडवळकर हा दापोली तालुक्यातील एका शाळेत लिपिक म्हणून कार्यरत होता. १७ जून रोजी सकाळी सुमारे आठ वाजता तो नेहमीप्रमाणे दुचाकी घेऊन घराबाहेर पडला होता. मात्र सायंकाळपर्यंत घरी परतला नाही. कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, परंतु तो कुठेही आढळून आला नाही. त्यानंतर मंडणगड पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

तपासादरम्यान निखिल त्या दिवशी कामावरही गेला नसल्याचे समोर आले. तसेच त्याचे दोन्ही मोबाईल फोन बंद असल्याने शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली होती. नातेवाईक आणि ग्रामस्थ विविध ठिकाणी त्याचा शोध घेत होते.

दरम्यान, २० जून रोजी किल्ले मंडणगड येथे दर्ग्यालगत असलेल्या बोरीच्या झाडाला त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. घटनास्थळाजवळ त्याची दुचाकीही उभी असल्याचे दिसून आले. तसेच त्याच्या शर्टच्या वरच्या खिशात हस्तलिखित चिठ्ठी (सुसाईड नोट) आढळल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या चिठ्ठीतील मजकूर आणि घटनेमागील कारणांचा तपास पोलीस करत आहेत.

ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निखिल हा आपल्या आजीसोबत गावी राहत होता. त्याची आई आणि बहीण मुंबई येथे वास्तव्यास आहेत. दापोली येथे नोकरीत स्थिरावलेल्या निखिलच्या विवाहाबाबतही बोलणी सुरू होती. अशा परिस्थितीत त्याने टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मंडणगड पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *