मंडणगड तालुक्यातील तुळशी गणेशवाडी येथे सुट्टीसाठी गावी आलेल्या युवकाचा तुळशी धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १० मे रोजी घडली. अमित बाळकृष्ण शिगवण (वय ३२) असे मृत युवकाचे नाव असून या घटनेमुळे तुळशी गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमित शिगवण हे मुंबई येथे वास्तव्यास होते. मे महिन्याच्या सुट्टीसाठी ते आपल्या मूळ गावी तुळशी गणेशवाडी येथे आले होते. रविवारी सायंकाळी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास ते कुटुंबीयांसह तुळशी धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. यावेळी किनाऱ्यालगत पाण्यात उतरल्यावर पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते अचानक खोल पाण्यात गेले आणि बुडाले.
घटनेची माहिती मिळताच मंडणगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. पोलिस निरीक्षक नितीन गवारे, बीट अंमलदार दत्ताराम बाणे तसेच स्थानिक ग्रामस्थांनी रात्रभर शोधकार्य केले. मात्र, धरणातील खोल पाणी, गाळ आणि कालव्याच्या दरवाज्यांमुळे शोधकार्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या.
सोमवारी सकाळी महाड येथील साळुंखे रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. प्रशांत साळुंखे आणि त्यांच्या पथकाने अथक प्रयत्न करत अखेर अमित शिगवण यांचा मृतदेह चिखलात अडकलेल्या अवस्थेत शोधून काढला. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, मंडणगड येथे पाठविण्यात आला आहे.
दरम्यान, तालुक्यातील तिडे, भोळवली, चिंचाळी, पंदेरी आणि तुळशी धरण परिसरात सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मे महिन्यात पाण्याची टंचाई असल्याने अनेक नागरिक धरण परिसरात आंघोळीसाठी किंवा फिरण्यासाठी जात असतात. मात्र, पाण्याची खोली, गाळ आणि चिखल यांची पुरेशी माहिती नसल्याने अशा दुर्घटनांचा धोका वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
धरण परिसरात इशारा फलक, सुरक्षा रक्षक आणि आवश्यक सुरक्षाव्यवस्था नसल्याने यापूर्वीही अशा दुर्घटना घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. प्रशासनाने तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना राबवाव्यात, अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













