Breaking News
रत्नागिरी : हातखंबा येथील ढाब्यावरून तरुण बेपत्ता, अपहरणाचा गुन्हा दाखल मंडणगड–वेळास मार्गावर एसटी बसची फार्महाउसच्या भिंतीला धडक, तीन महिला प्रवासी जखमी चिपळूणमध्ये भाजपचा पक्षविस्ताराचा झंझावात! मार्कंडी, शंकरवाडी, ओझरवाडीतील शेकडो तरुणांचा पक्षप्रवेश, जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या उपस्थितीत तरुणांनी हाती घेतले कमळ चिपळूण : 33 वर्षीय तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल, वाशिष्ठी नदीपात्राजवळ बॅग, मोबाईल व अन्य साहित्य आढळले राजापूरमध्ये राज्य दहशतवादविरोधी पथक ATS आणि IB ची संयुक्त कारवाई , एकाच कुटुंबातील तिघांची दिवसभर चौकशी! आंतरराष्ट्रीय धार्मिक संघटनेशी संबंधित व्हॉट्सॲप समूहाच्या संपर्काचा संशय?

मंडणगड : लाचखोरीप्रकरणी अमित शिगवण, श्रीनिवास श्रीरामे, सजा म्हाप्रळ आणि मारुती भोसलेला तीन दिवसांची पोलीस कोठडी

banner 468x60

मंडणगड येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई करत मंडळ अधिकारी, तलाठी आणि एका शिपायास लाच घेताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदारांनी त्यांच्या पत्नीच्या नावावर मौजे शेणाळे, ता. मंडणगड येथे लिलावातून शेतजमीन खरेदी केली होती. या जमिनीची फेरफार नोंद करून सातबारा उतारा मिळवण्यासाठी त्यांनी संबंधित मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्याशी संपर्क साधला. हे काम करून देण्यासाठी उप कोषागार कार्यालयातील शिपाई मारुती भोसले याने तक्रारदाराकडे ५०,००० रुपयांची लाच मागितली होती.

त्यापैकी ४५,००० रुपये भोसले याने ऑनलाइन स्वीकारले होते. मात्र, संपूर्ण रक्कम न मिळाल्याने मंडळ अधिकाऱ्याने फेरफार नोंद रद्द केली होती. यानंतर, तक्रारदाराने २७ मे रोजी मंडळ अधिकारी अमित शिगवण (मंडळ अधिकारी, म्हाप्रळ), श्रीनिवास श्रीरामे (ग्राम महसूल अधिकारी, सजा म्हाप्रळ, अतिरिक्त कार्यभार सोवेली) आणि मारुती भोसले यांची भेट घेतली.

यावेळी प्रलंबित काम पूर्ण करण्यासाठी मंडळ अधिकारी अमित शिगवण याने तक्रारदाराकडे ३०,००० रुपयांची लाच मागितली. एसीबीने केलेल्या पडताळणी कारवाईदरम्यान ही मागणी करण्यात आली. तक्रारदाराकडून ३०,००० रुपये लाच रक्कम पंचांसमक्ष स्वीकारताना अमित शिगवण याने स्वतःसाठी १५,५०० रुपये ठेवून उर्वरित १४,५०० रुपयांचा हिस्सा तलाठी श्रीनिवास श्रीरामे यांना दिला.

या लाचखोरी प्रकरणी मंडळ अधिकारी अमित शिगवण, ग्राम महसूल अधिकारी श्रीनिवास श्रीरामे आणि शिपाई मारुती भोसले यांना पंचासमक्ष ताब्यात घेण्यात आले. मंडणगड पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद क्रमांक २०/२०२५ अन्वये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (संशोधन २०१८) च्या कलम ७, ७ अ, १२ अंतर्गत २८ मे २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक केलेल्या आरोपींना २९ मे २०२५ रोजी मा. अति. सत्र व विशेष न्यायाधीश, खेड यांच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना तपासकामी ३१ मे २०२५ पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *