रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा येथील ईश्वर ढाब्यावरून राजस्थानला जाण्यासाठी निघालेला २३ वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. सुनील कुमार गणपतलाल वर्मा असे या तरुणाचे नाव असून, तो अद्याप घरी पोहोचलेला नसल्याने त्याच्या अपहरणाचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनील कुमार गणपतलाल वर्मा (वय २३, रा. बिचपडी, देवीपरा, तालुका शहापुरा, जिल्हा जयपूर, राजस्थान) हा २ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १२.४० वाजण्याच्या सुमारास हातखंबा येथील ईश्वर ढाब्यावरून राजस्थानमधील आपल्या घरी जाण्यासाठी निघाला होता. मात्र, त्यानंतर तो अद्याप घरी पोहोचलेला नाही.
त्याचा शोध घेण्यासाठी नातेवाईक, मित्रपरिवार तसेच तो काम करत असलेल्या ठिकाणी चौकशी करण्यात आली. मात्र, त्याच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्याला अज्ञात व्यक्तीने गुप्तपणे व गैरकायदेशीररीत्या ताब्यात ठेवण्याच्या उद्देशाने अपहरण केले असावे, अशी फिर्यादी अमरचंद प्रभातराम यादव (वय ३६, व्यवसाय कंत्राटदार, सध्या रा. कट्टा, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग; मूळ रा. राजस्थान) यांनी तक्रार दिली.
या तक्रारीवरून रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात १२ ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक २५९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १४०(३) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेपत्ता तरुणाचा शोध सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













