कै. डॉ. मोहन महादेव गुजर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दशानेमा गुजर युवक संस्था, दापोली आणि कुमार फ्रेंड सर्कल स्पोर्ट्स, पालगड यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी पालगड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे हे दुसरे पर्व असून, दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत पालगड बसस्थानकासमोरील कुमार फ्रेंड सर्कल स्पोर्ट्स येथे हे शिबिर होणार आहे.
कै. डॉ. मोहन महादेव गुजर हे दापोलीतील दशानेमा समाजातील ज्येष्ठ, अनुभवी आणि जाणकार डॉक्टर म्हणून परिचित होते. वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासोबतच त्यांना राजकीय आणि सामाजिक कार्याचाही वारसा लाभला होता. त्यांच्या कार्याची स्मृती जपण्याबरोबरच समाजोपयोगी उपक्रमातून त्यांना आदरांजली वाहण्याच्या उद्देशाने या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.
गतवर्षी फणसू प्राथमिक आरोग्य केंद्र येथे या स्मृती शिबिराचे पहिले पर्व यशस्वीरीत्या पार पडले होते. त्यानंतर यंदा पालगड येथे दुसऱ्या पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी करून घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
विविध वैद्यकीय तज्ज्ञांकडून तपासणी
या शिबिरामध्ये डॉ. कुणाल मेहता (एम.एस. जनरल सर्जरी), डॉ. शेखर तलाठी (एम.एस. ऑर्थोपेडिक सर्जरी), डॉ. वरुण मोदी (बीडीएस), डॉ. सचिन गुजर (बीएचएमएस) आणि डॉ. समर्थ पेंढारे (बीएएमएस) हे वैद्यकीय तज्ज्ञ नागरिकांची तपासणी करणार आहेत.
सोनोग्राफी आणि औषधांवर विशेष सवलत
शिबिरामध्ये तपासणी केल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सोनोग्राफीची आवश्यकता असलेल्या रुग्णांना दापोली येथील डॉ. समीक्षा मेहता यांच्या निष्कर्ष सोनोग्राफी अँड डायग्नोस्टिक सेंटरमध्ये सोनोग्राफी तपासणीवर २० टक्के विशेष सवलत देण्यात येणार आहे.
तसेच शिबिरात तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी लिहून दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवरील औषधांवर पालगड येथील कलावती मेडिकल स्टोअरमध्ये १० टक्के विशेष सवलत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा
ग्रामीण भागातील नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देणे आणि आरोग्याविषयी जागरूकता वाढवणे, हा या उपक्रमामागील महत्त्वाचा उद्देश आहे. कै. डॉ. मोहन गुजर यांच्या स्मृती जपत समाजहिताचा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन दशानेमा गुजर युवक संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुणाल मेहता, कुमार फ्रेंड सर्कल स्पोर्ट्सचे अध्यक्ष अनंत बामणे आणि प्रकल्प समन्वयक सिद्धेश शेठ यांनी केले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













