मंडणगड येथे घरकुल योजना मंजूर झाल्याचे आमिष दाखवून एका भामट्याने वृद्ध महिलेची फसवणूक करत तिच्या गळ्यातील सुमारे ८० हजार रुपये किमतीची सोन्याची बोरमाळ लंपास केल्याची घटना मंडणगड येथील दुर्गवाडी परिसरात घडली. याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नरेश सदानंद बैकर (वय ४५, रा. दुर्गवाडी, मंडणगड) यांच्या घरी २५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी साडेतीन ते पावणेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यावेळी त्यांची आई कलावती सदानंद बैकर या घरात एकट्याच होत्या. याच संधीचा फायदा घेत आरोपी त्यांच्या घरी आला.
आपण मंडणगड तहसीलदार कार्यालयातून आलो असून, तुमचे घरकुल मंजूर झाले आहे. त्यासाठी दोन हजार रुपये भरावे लागतील, तसेच फोटो आणि आधारकार्ड आवश्यक असल्याचे आरोपीने कलावती यांना सांगितले. या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांनी पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर आरोपीने गळ्यातील बोरमाळ देण्यास सांगितले. त्यानुसार आरोपीने त्यांच्या गळ्यातील सोन्याची बोरमाळ घेऊन तेथून पळ काढला.
चोरीस गेलेल्या बोरमाळेचे वजन सुमारे १५ ग्रॅम असून, तिची किंमत अंदाजे ८० हजार रुपये आहे. या प्रकरणी नरेश बैकर यांनी १८ नोव्हेंबर रोजी रात्री मंडणगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक १३६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२) आणि ३१८(४) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताची ओळख सुरेश सुरक्या गवस्कर (वय ४७, रा. नागाव, ता. माणगाव, जि. रायगड) अशी नमूद करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास मंडणगड पोलीस करत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













