मंडणगड : अतिवेगामुळे अपघात, महिला डॉक्टर गंभीर जखमी

banner 468x60

मंडणगड तालुक्यातील आंबडवे-लोणंद महामार्गावर शिरगाव परिसरात शनिवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात महिला डॉक्टर गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून, त्या सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत. या अपघातामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, दि.18 एप्रिल शनिवारी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास मारुती स्विफ्ट ही कार आंबडवे-लोणंद महामार्गावरून जात होती. यावेळी चालकाने रस्त्याची स्थिती आणि वाहतुकीची परिस्थिती लक्षात न घेता अतिवेगाने वाहन चालविले. तसेच, चुकीच्या बाजूने वाहन चालवित असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.

यामुळे भरधाव वेगातील कार थेट रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या मेटल बॅरिकेडवर जोरात आदळली. या धडकेत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वाहनाचा पुढील भाग पूर्णतः चुराडा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या अपघातात डॉ. सबिया असद मुल्ला (वय ३२, रा. गोरेगाव, जि. रायगड) या गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तात्काळ बाहेर काढून भिंगळोली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले.

मात्र, त्यांच्या जखमा गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना तातडीने मुंबई येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान, मंडणगड ग्रामीण रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला डॉक्टरांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्या मृत्यूशी झुंज देत आहेत.

या अपघाताची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

सुरक्षिततेकडे दुर्लक्ष जीवावर बेतले
या घटनेमुळे पुन्हा एकदा अतिवेग आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन किती घातक ठरू शकते, हे समोर आले आहे. विशेषतः वळणावळणाच्या आणि अरुंद रस्त्यांवर वाहन चालविताना काळजी घेणे आवश्यक असल्याचे अधोरेखित झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *