मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लांजा तालुक्यातील शांतीनगर रेस्ट हाऊसजवळ आज (बुधवार) सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. गोव्याहून मुंबईकडे निघालेली क्रेटा कार (MH 01 CP 8021) रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला (MH 05 EL 3877) पाठीमागून जोरदार धडकली. धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की कारचा अक्षरशः चुराडा झाला.
या भीषण अपघातात दोन महिला आणि एका पुरुषासह एकूण चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अन्य दोन जण गंभीर जखमी असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच लांजा पोलीस, महामार्ग प्रशासन तसेच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. वाहनात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात हलविण्यात आले.
या अपघातामुळे काही काळ मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, पोलिसांनी आणि महामार्ग प्रशासनाने तातडीने वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या.
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून मृतांच्या ओळखीबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













