लांजा : उत्पादन शुल्कची धडक कारवाई, गोवा बनावटीचा मद्यसाठा व टेम्पोसह 23.63 लाखांचा मुद्देमाल जप्त

banner 468x60

राजापूर तालुक्यातील हातीवले टोलनाका येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी पहाटे ४ ते ६ वाजण्याच्या दरम्यान धडक कारवाई करत गोवा बनावटीचा विदेशी मद्यसाठा आणि टेम्पोसह एकूण २३ लाख ६३ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मुंबई–गोवा महामार्गावरून बेकायदेशीर मद्यवाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

banner 728x90


मिळालेल्या माहितीनुसार, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग, रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक सी. एल. कदम, जवान रोहित लोंढे, सागर उबाळे व पथकातील कर्मचाऱ्यांनी हातीवले टोलनाका येथे सापळा रचला होता.


पहाटेच्या सुमारास गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अशोक लेलँड कंपनीच्या ‘बडा दोस्त’ टेम्पोची (क्र. एमएच ०८ एपी ४३८७) तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान टेम्पोमध्ये गोवा बनावटीचा मोठ्या प्रमाणात मद्यसाठा आढळून आला. यामध्ये टुबर्ग स्ट्रॉंग बिअर, किंगफिशर स्ट्रॉंग बिअरचे टीन तसेच अन्य विदेशी मद्याचा समावेश होता. जप्त मद्याची किंमत १८ लाख १३ हजार १२० रुपये असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या टेम्पोची किंमत ५ लाख ५० हजार रुपये आहे. त्यामुळे एकूण जप्त मुद्देमालाची किंमत २३ लाख ६३ हजार १२० रुपये इतकी आहे.


या प्रकरणी टेम्पो चालक चेतक भरत वाळवे (वय ३०, रा. तिवरे, वाळवेवाडी, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग, रत्नागिरी आर. जी. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *