मंडणगड : बामणघरमध्ये जमीन घोटाळा, बाप लोकांनी जमिनीच्या मालकालाच लावला चुना, “पॉवर ऑफ अ‍ॅटर्नीचा गैरवापर, 52 एकर जमीन लाटली, 41 लाखांचा घोटाळा उघड

banner 468x60

मंडणगड तालुक्यातील बामणघर गावात जमीन खरेदीच्या व्यवहारातून मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ६७ वर्षीय व्यापारी महेश रामनिरंजन चामरिया (रा. विलेपार्ले, मुंबई) यांची तब्बल ५२ एकर जमीन, सुमारे ४१ लाख ११ हजार ६०० रुपये किमतीची, विश्वासाचा गैरवापर करून हडप करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मंडणगड पोलिसांनी बाप-लेकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

banner 728x90


समिप सुनील दरिपकर आणि सुनील दत्तात्रय दरिपकर (रा. घनसोली, नवी मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेश चामरिया यांच्याशी आरोपी सुनील दरिपकर यांचे गेल्या १५ वर्षांपासून व्यावसायिक संबंध होते. ते चामरिया यांच्या कंपनीत फॅक्टरी मॅनेजर म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांनी विश्वास संपादन केला होता.


दरम्यान, सुनील दरिपकर यांचा मुलगा समिप दरिपकर हा मागील काही वर्षांपासून दापोली परिसरात जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार पाहत होता. चामरिया यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून जमीन खरेदीसाठी कुळमुखत्यारपत्र (पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी) दिले होते. या अधिकाराच्या आधारे तो त्यांच्या वतीने व्यवहार करू शकत होता.


मात्र, १४ जुलै २०१४ ते १० जानेवारी २०२५ या कालावधीत आरोपी बाप-लेकांनी संगनमत करून या अधिकाराचा गैरवापर केल्याचे तपासात समोर आले आहे. फिर्यादीने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या जमिनी त्यांच्या नावावर नोंदवण्याऐवजी, समिप दरिपकर याने त्या जमिनी स्वतःच्या आणि वडील सुनील दरिपकर यांच्या नावावर खरेदीखत करून घेतल्या. अशा प्रकारे ५२ एकर जमीन बेकायदेशीररीत्या हस्तगत करण्यात आली.


हा प्रकार लक्षात आल्यानंतर चामरिया यांनी आरोपींकडे स्पष्टीकरण मागितले. मात्र, आरोपींनी उलट त्यांच्याकडे २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. तसेच ही रक्कम न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.


या सर्व प्रकारामुळे हादरलेल्या चामरिया यांनी न्यायासाठी मंडणगड न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानंतर १७ एप्रिल २०२६ रोजी मंडणगड पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ अंतर्गत कलम ३१६(२), ३१८(४), ३३६(३), ३३८ आणि ३५१(३) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


सध्या या प्रकरणाचा अधिक तपास मंडणगड पोलीस करत असून, जमीन व्यवहारातील या मोठ्या फसवणुकीमुळे स्थानिक परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून आरोपींच्या व्यवहारांची सखोल चौकशी सुरू असून, आणखी काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *