रत्नागिरी शहरालगतच्या काळबादेवी-नवानगर परिसरात जमीन हद्दीच्या वादातून एकाच कुटुंबातील भावांमध्ये झालेला वाद शनिवारी सकाळी हिंसक स्वरूप धारण करत मारहाण, शिवीगाळ, धमक्या आणि मालमत्तेच्या नुकसानीपर्यंत पोहोचला. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून, परिसरात या घटनेची मोठी चर्चा सुरू आहे.
ही घटना शनिवारी (११ एप्रिल) सकाळी पावणे आठच्या सुमारास काळबादेवी-नवानगर येथे घडली. राकेश प्रभाकर मयेकर (वय ५१), जगदिश प्रभाकर मयेकर (वय ५५) आणि संतोष प्रभाकर मयेकर (वय ४९, सर्व रा. काळबादेवी-नवानगर, रत्नागिरी) अशी संबंधितांची नावे आहेत. तिघेही नात्याने सख्खे भाऊ असून, त्यांच्यात अनेक दिवसांपासून जमीन जागेच्या हद्दीवरून वाद सुरू असल्याचे समोर आले आहे.
संतोष मयेकर यांची तक्रार
संतोष प्रभाकर मयेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवारी सकाळी राकेश मयेकर हातात दांडका घेऊन त्यांच्या घराच्या अंगणात आले. त्यावेळी त्यांनी संतोष यांच्या आईला उद्देशून “तुम्ही माझ्या बांधकामाला विरोध करू नका, त्या हद्दीतूनही जाऊ नका, नाहीतर तंगडे तोडून टाकीन,” अशी धमकी देत शिवीगाळ केली.
यावेळी संतोष यांच्या आईने संबंधित जागा सामाईक मालकीची असल्याचे सांगत विरोध दर्शविला. त्यामुळे संतापलेल्या राकेश यांनी दांडक्याने मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांनी घरासमोरील दुचाकी ढकलून तिचे नुकसान केले. तसेच हद्दीवर मोजणी करून उभारलेले सिमेंटचे पोल तोडून टाकले.
फिर्यादीत पुढे नमूद केल्याप्रमाणे, राकेश यांनी घरात घुसून बॅगेत ठेवलेले जमिनीचे खरेदीखत परवानगीशिवाय घेऊन गेले. संतोष यांच्या आईला ढकलून देत जीवे ठार मारण्याची धमकीही दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
राकेश मयेकर यांची प्रतितक्रार
दुसरीकडे, राकेश प्रभाकर मयेकर यांनीही ग्रामीण पोलिस ठाण्यात स्वतंत्र फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, ते सकाळी कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडले असता जगदिश आणि संतोष यांनी त्यांच्या अंगणात बांधकाम केलेला गडगा तोडण्याची मागणी केली.
राकेश यांनी नकार दिल्यावर संतोष यांनी शिवीगाळ व दमदाटी केल्याचे त्यांनी म्हटले आहे. “ही जागा सामाईक असून त्यावर माझाही हक्क आहे,” असे सांगितल्यावर जगदिश यांनी त्यांचे म्हणणे न ऐकता मारहाण सुरू केली. झटापटीदरम्यान त्यांच्या हाताला ओरखडे लागले, तर जगदिश यांनी लाकडी दांडक्याने पाठीवर व हातावर मारून दुखापत केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच ठार मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
या दोन्ही परस्परविरोधी तक्रारींवरून ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घटनेमागील नेमके कारण, जागेच्या मालकीचा प्रश्न आणि प्रत्यक्ष वादाची पार्श्वभूमी तपासली जात असून, संबंधितांकडून अधिक चौकशी सुरू आहे.
जमीन हद्दीच्या वादातून एकाच कुटुंबातील भावांमध्ये असा संघर्ष उफाळून आल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण पोलिस अधिक तपास करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













