Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

खेड : तालुक्यातील दुर्दैवी घटना : नदीच्या डोहात बुडून 12 वर्षीय मुलीचा मृत्यू, धामणंद गावावर शोककळा

banner 468x60

खेड : तालुक्यातील वावे काजू फाटा परिसरात मंगळवारी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत १२ वर्षीय बालिकेचा नदीच्या डोहात बुडून मृत्यू झाला. मानसी रामचंद्र कदम (रा. धामणंद, रोहीदासवाडी, ता. खेड) असे मृत बालिकेचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, मानसी ही मंगळवार, दि. २८ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास आपल्या आईसोबत वावे काजू फाटा येथील नदीवर कपडे धुण्यासाठी गेली होती. उन्हाळ्याचे दिवस असल्याने नदीत पाणी कमी असले तरी काही ठिकाणी खोल डोह तयार झाले आहेत. मानसीची आई रीना कदम या कपडे धुण्यात व्यस्त असताना मानसी नदीकाठावर खेळत होती.

दरम्यान, खेळताना तिचा अचानक तोल गेला आणि पाय घसरून ती थेट नदीतील खोल डोहात पडली. पाण्याचा अंदाज न आल्याने ती बुडू लागली. हा प्रकार लक्षात येताच आईने आरडाओरडा केला. तिच्या आवाजाने परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

ग्रामस्थांनी तातडीने नदीत उतरून शोधमोहीम सुरू केली. काही वेळाच्या अथक प्रयत्नांनंतर सकाळी सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास मानसीला पाण्याबाहेर काढण्यात आले. त्या वेळी ती बेशुद्ध अवस्थेत होती. ग्रामस्थांच्या मदतीने तिला तात्काळ वावे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर तिची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी तिला पुढील उपचारासाठी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.

मात्र, उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती मानसीला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेने तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, उन्हाळ्याच्या काळात नदी, विहिरी आणि डोहांजवळ खेळताना लहान मुलांनी आणि पालकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे धामणंद गावासह संपूर्ण खेड तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *