खेड तालुक्यातील भेलसई गावात एका महिलेला पोलीस तक्रार मागे घेण्यासाठी धमकावल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. तक्रार मागे न घेतल्यास ग्रामपंचायतीतील नोकरीवरून काढून टाकू, ग्रामसभेत बदनामी करू तसेच कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ जून रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास फिर्यादी महिला आपल्या घरी असताना प्रमोद पांडुरंग कदम, शंकर गणू धाडवे, विजय संभाजी कदम, आनंद शंकर कदम, अशोक रामचंद्र कदम, कृष्णा नाना कदम, संदीप गोविंद कदम, विनोद यशवंत कदम आणि भार्गव नाना कदम यांनी तिच्या घरात बेकायदेशीर प्रवेश केल्याचा आरोप आहे.
यावेळी आरोपींनी प्रमोद कदम याच्याविरोधात खेड पोलीस ठाण्यात दाखल केलेली तक्रार तातडीने मागे घेण्याचा दबाव टाकला. तक्रार मागे घेतली नाही तर ग्रामपंचायत भेलसई येथील नोकरी गमवावी लागेल, अशी धमकी देण्यात आली. तसेच सर्वांसमक्ष आक्षेपार्ह वक्तव्य करत महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
यानंतर २२ जून रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास आरोपींनी संबंधित महिलेला कृष्णा कदम यांच्या घरी बोलावून पुन्हा तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणला. तक्रार कायम ठेवल्यास कुटुंबीयांना परिणाम भोगावे लागतील, नोकरीवर कशी येते ते पाहू आणि ग्रामसभेत बदनामी करू, अशा शब्दांत धमकी देऊन मानसिक छळ करण्यात आल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.
या घटनांमुळे घाबरलेल्या महिलेने अखेर खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित नऊ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) मधील कलम १८९(२), १९०, ३२९(४) आणि ३५२(२) अंतर्गत गुन्हा नोंदविला असून, प्रकरणाचा पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













