खेड तालुक्यातील बिजघर-लाववाडी परिसरातून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे मध्यरात्रीच्या सुमारास अपहरण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शनिवार, २१ मार्च रोजी रात्री सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला असून, याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी शनिवारी रात्री घरात झोपलेली होती. मध्यरात्रीनंतर ती बेपत्ता असल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. सुरुवातीला ती घराजवळच कुठेतरी गेली असावी, असा समज करून कुटुंबीयांनी परिसरात शोध सुरू केला. आईसह नातेवाईकांनी शेजारी-पाजारी, मित्र-मैत्रिणी आणि ओळखीच्या सर्व ठिकाणी तिचा कसून शोध घेतला. मात्र, बराच वेळ उलटूनही मुलीचा काहीही ठावठिकाणा लागला नाही.
परिस्थिती गंभीर असल्याची जाणीव झाल्यानंतर कुटुंबीयांनी तात्काळ खेड पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घटनेची तक्रार नोंदवली. मुलगी अल्पवयीन असल्यामुळे अपहरणाचा संशय व्यक्त करत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खेड पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १३७ (२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समेळ सुर्वे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मुलीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. तसेच स्थानिक नागरिकांकडूनही माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, अपहरण झालेल्या मुलीबाबत कोणतीही माहिती असल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल तसेच योग्य ते बक्षीसही दिले जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या घटनेमुळे खेड तालुक्यातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पालकांनी आपल्या मुलांच्या सुरक्षेबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*














