खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी परिसरात असलेल्या नोव्होकेम टेक्नॉलॉजीस लिमिटेड या कंपनीतून तब्बल २ लाख ५४ हजार ९५० रुपये किमतीची लोखंडी वजन मापे चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे औद्योगिक वर्तुळात खळबळ उडाली असून, खेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही चोरी २५ मार्च ते २ एप्रिल २०२६ या कालावधीत घडली आहे. फिर्यादी अमोल आनंद अकुलकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कंपनीच्या पॅकिंग स्टोअरच्या बाहेरील भागात लाकडी पॅलेटवर २० किलो वजनाची लोखंडी षटकोनी मापे ठेवण्यात आली होती. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे देखरेख केली जात होती.
१ एप्रिल रोजी सायंकाळी अकुलकर यांनी २५ वजन मापांची मोजणी करून ती व्यवस्थित ठेवली होती. मात्र, २ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ९.३० वाजता पाहणी केली असता, त्यापैकी १० मापे गायब असल्याचे निदर्शनास आले. यानंतर कंपनी प्रशासनाने तातडीने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संशयास्पद हालचाली आढळून आल्या.
फुटेजमध्ये २ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ८.२० वाजण्याच्या सुमारास एम.एच. ०६ बी.डब्ल्यू. ३०८९ क्रमांकाचा आयशर ट्रक कंपनीत येताना दिसतो. या ट्रकचा चालक केबिनमधून उतरून क्लिनर बाजूच्या दरवाजाजवळ सुमारे १० मिनिटे थांबत असल्याचे दिसून आले. त्याच्या हालचाली संशयास्पद असल्याने याच चालकाने पॅलेटवरील १० वजन मापे चोरल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रकरणात एकूण २२१ वजन मापे चोरीला गेल्याचे समोर आले आहे. यात सिद्धीविनायक सिस्टम्सकडून खरेदी केलेली १ लाख ८७ हजार ५०० रुपये किमतीची १५० मापे आणि अर्पन इंजिनिअरिंग कॉर्पोरेशनकडून घेतलेली ६७ हजार ४५० रुपये किमतीची ७१ मापे असा एकूण २ लाख ५४ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला आहे.
खेड पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा नोंदवला असून, संशयित ट्रक चालक संजय सितापराव याच्या दृष्टीने तपास सुरू केला आहे. औद्योगिक व सुरक्षा व्यवस्थेने सज्ज असलेल्या एमआयडीसी परिसरात अशी चोरी घडल्याने उद्योग क्षेत्रात चिंतेचे वातावरण पसरले आहे. पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे पुढील तपास वेगाने सुरू असून, लवकरच आरोपीचा माग काढला जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*














