खेड : लोटे एमआयडीसीत टँकर चालकांमध्ये तुफान हाणामारी; व्हिडिओच्या गैरसमजातून लाकडी दांडक्याने मारहाण

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड लोटे एमआयडीसी परिसरातील विनती कंपनीच्या पार्किंगमध्ये टँकर चालकांमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे रूप हाणामारीत झाल्याची घटना समोर आली आहे. एका व्हिडिओवरून निर्माण झालेल्या गैरसमजातून दोन चालकांनी अन्य चालकाला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा आरोप असून या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ जून २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास लोटे एमआयडीसीतील विनती कंपनीच्या पार्किंगमध्ये ही घटना घडली. संदीप चंद्रभान सिंह (वय ३३, व्यवसाय चालक, रा. रायबरेली, उत्तर प्रदेश) हे आपल्या टँकरमध्ये बसले असताना पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या इतर काही टँकरांची पाहणी करत होते.

यावेळी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या काही टँकरांना सुरक्षेसाठी आवश्यक असलेले लाकडी ठोकळे (व्हील चॉक) लावण्यात आले नव्हते. या संदर्भातील व्हिडिओ संदीप सिंह यांनी तयार करून ट्रान्सपोर्ट कार्यालयाकडे पाठवला आणि संबंधित वाहनचालकांविरोधात तक्रार केली, असा समज इतर चालकांनी करून घेतला. या गैरसमजातून चालकांमध्ये वाद निर्माण झाला.

वाद वाढत गेल्यानंतर आरोपी नीरज मिश्रा आणि मनोज पांडे यांनी संतापाच्या भरात संदीप सिंह यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोघांनी लाकडी दांडक्याने त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या मारहाणीत संदीप सिंह यांच्या शरीराच्या विविध भागांना दुखापत झाली.

घटनेनंतर जखमी संदीप सिंह यांनी खेड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्राथमिक चौकशी केल्यानंतर आरोपी नीरज मिश्रा आणि मनोज पांडे यांच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ११८(१), ३५२ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

औद्योगिक क्षेत्रातील पार्किंग परिसरात घडलेल्या या घटनेमुळे वाहनचालक आणि कामगारांमध्ये खळबळ उडाली आहे. केवळ गैरसमजातून वाद निर्माण होऊन तो मारहाणीपर्यंत पोहोचल्याने एमआयडीसी परिसरातील सुरक्षेचा प्रश्नही पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, घटनेतील सर्व बाबींची पडताळणी करून आरोपींविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले असून खेड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *