खेड तालुक्यातील धामणदेवी ग्रामपंचायतीविरोधात ग्रामस्थ संदेश पेवेकर यांनी विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. ग्रामपंचायतीतील कथित मनमानी कारभार, विकासकामांतील निष्क्रियता, माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन आणि शासकीय नियमभंगाच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

पेवेकर यांच्या म्हणण्यानुसार, ग्रामपंचायतीकडे त्यांनी तीन वेळा लेखी तक्रारी केल्या; मात्र त्यावर कोणतीही प्रभावी कार्यवाही करण्यात आली नाही. त्यानंतर पंचायत समिती, खेड यांच्याकडून ग्रामपंचायतीला कार्यवाहीचे आदेश देण्यात आले होते, परंतु त्या आदेशांकडेही दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

तसेच, त्यांनी ग्रामपंचायतीकडे 11 माहिती अधिकार (RTI) अर्ज दाखल केले होते. मात्र, या अर्जांना विहित मुदतीत उत्तर देण्यात आले नसल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्येक वेळी अपील प्रक्रिया करावी लागली असून, अपील अधिकाऱ्यांच्या सूचनांनंतरही माहिती देण्यास विलंब झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ग्रामसभेच्या ठरावानंतरही प्रलंबित विकासकामांबाबत ठेकेदारांना नोटीस देण्यात आलेली नाही, तसेच कामे अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्यात आलेली नसल्याचे पेवेकर यांनी सांगितले. टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन वर्क ऑर्डर देण्यात आलेल्या अनेक कामांना दीड ते दोन वर्षे उलटूनही ती अपूर्ण असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
याशिवाय, ग्रामपंचायतीने लेखी स्वरूपात ग्रामसेवकाची हालचाल नोंदवही (Movement Register) उपलब्ध नसल्याचे नमूद केल्याचा दावा करत, हा शासकीय नियमांचा भंग असल्याचे पेवेकर यांनी म्हटले आहे. ग्रामपंचायतीचे मासिक व ग्रामसभेचे ठराव माहिती फलकावर प्रसिद्ध केले जात नसल्याने पारदर्शकतेचा अभाव असल्याचाही आरोप त्यांनी केला.
“पंचायत समितीच्या आदेशाकडे दुर्लक्ष, 11 RTI अर्जांना उत्तर नाही, अपूर्ण विकासकामे, ग्रामसभेच्या ठरावांची अंमलबजावणी नाही आणि हालचाल नोंदवहीचा अभाव या गंभीर बाबींवर ठोस कारवाई होईपर्यंत माझे आमरण उपोषण सुरू राहील,” असा इशारा संदेश पेवेकर यांनी दिला आहे.
दरम्यान, या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित अधिकारी व ग्रामसेवकावर आवश्यक कारवाई करावी, तसेच प्रलंबित विकासकामे पूर्ण करून ग्रामपंचायतीच्या कामकाजात पारदर्शकता आणावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













