दाभोळ-गुहागर परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘झर्फ एम.एच.ओ ग्रुप दुबई’तर्फे सत्कार

banner 468x60

दाभोळ-गुहागर परिसरातील विद्यार्थ्यांनी यंदाच्या दहावी, बारावी, केंद्रीय शिक्षण मंडळाच्या परीक्षांबरोबरच धार्मिक शिक्षण क्षेत्रातही उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची दखल घेत झर्फ एम.एच.ओ. ग्रुप दुबईतर्फे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करून त्यांच्या परिश्रमांचे आणि यशाचे कौतुक करण्यात आले.

धार्मिक शिक्षण क्षेत्रात कुमार रशाद रौफमिया पालनाईक यांनी सन २०२६ मध्ये ‘आलिमियत’ पदवी प्राप्त करून कुराण, हदीस, फिक्ह आणि तफसीर या विषयांमध्ये प्राविण्य मिळवले. तसेच कुमार इब्राहिम शाह बिलाल ताहीर तांबे यांनी बारावी शिक्षण पूर्ण करत असतानाच कुराण-ए-पाकचे ‘हिफ्झ’ पूर्ण करण्याचा मान मिळवला. कुमार अफ्नान मोहम्मद आरिफ चेलकर यांनी नूरानी कायदा व दीनी तालीम अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला.

दहावी परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले. कुमारी मरियम मुबारक माखजनकर यांनी ९२.६० टक्के गुण मिळवून विशेष कामगिरी केली. कुमारी आसिया रौफमिया पालनाईक यांनी ८६.४० टक्के, कुमारी जोहा हिदायत फडणीस यांनी ८४.४० टक्के गुण मिळवत अंजुमन खैरुल इस्लाम शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. कुमारी तयमिना आरिफ दर्वेश यांनी ८४ टक्के तर कुमारी तनजीला इम्तियाज मुल्ला यांनी ७६ टक्के गुण मिळवले. याशिवाय इतर विद्यार्थ्यांनीही समाधानकारक यश संपादन करत परिसराचे नाव उज्ज्वल केले.

बारावी तसेच केंद्रीय शिक्षण मंडळाच्या परीक्षांमध्ये कुमारी सायमा बिलाल तांबे, कुमार सालीम शकील अहमद चेलकर, कुमारी सानिया अब्दुल समद फडणीस आणि कुमार अब्दुल मुकीत फैयाज मुगाये यांनीही उल्लेखनीय कामगिरी नोंदवली.

विद्यार्थ्यांच्या या यशाचा गौरव करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात झर्फ एम.एच.ओ. ग्रुप दुबईच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षण क्षेत्रात प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारा आणि त्यांना अधिक मोठी स्वप्ने पाहण्यास प्रेरणा देणारा ठरत आहे.

समाजातील होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य झर्फ एम.एच.ओ. ग्रुप दुबई सातत्याने करत असून त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना नवी ऊर्जा, प्रेरणा आणि भविष्यात अधिक यश मिळविण्याची उमेद प्राप्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *