मंडणगड : दगडाला ठेच लागून 59 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

banner 468x60

मंडणगड तालुक्यातील कुंबळे येथे गावात फिरत असताना दगडाला ठेच लागून पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या ५९ वर्षीय व्यक्तीचा मुंबईतील सर जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. विनोद महादेव गायकवाड (वय ५९, रा. कुंबळे पाटीलवाडी, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विनोद गायकवाड हे १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास गावात फिरत होते. यावेळी कुंबळे बसस्थानकाजवळ दगडाला ठेच लागल्याने त्यांचा तोल गेला आणि ते डोक्यावर पडले. या घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव सुरू झाला.

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने कुंबळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना मंडणगड ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. डोक्यातून रक्तस्राव होत असल्याने डॉक्टरांनी सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला. मात्र, मंडणगड येथे सीटी स्कॅनची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना माणगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

माणगाव येथे सीटी स्कॅन केल्यानंतर त्यांच्या डोक्यात रक्ताच्या गाठी झाल्याचे सांगण्यात आले. तेथील उपचारांच्या मर्यादित सुविधांमुळे त्यांना पुढील उपचारांसाठी १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे सात वाजता मुंबईतील सर जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र, रुग्णालयात उपचार सुरू असताना १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद सर जे.जे. मार्ग पोलीस ठाणे, मुंबई येथे आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली होती.

या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे २१ ऑक्टोबर २०२६ रोजी मंडणगड पोलीस ठाण्यात प्राप्त झाली. त्यानंतर मंडणगड पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू क्रमांक २०/२०२६ अशी नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे कुंबळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *