चिपळूण : गुरांची अवैध वाहतूक, दोघांवर गुन्हा दाखल, 13 गुरांची निर्दयीपणे वाहतूक

banner 468x60

कत्तलीच्या उद्देशाने १३ गुरांची दाटीवाटीने वाहतूक केली जात असल्याचा प्रकार चिपळूण तालुक्यातील पोफळी-पवारवाडी फाटा परिसरात उघडकीस आला आहे. सोमवारी रात्री अलोरे-शिरगाव पोलिसांनी सापळा रचून गुरांची वाहतूक करणारा टेम्पो पकडला. या कारवाईत गुरे आणि टेम्पो असा एकूण ९ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेली गुरे लोटे येथील गोशाळेत पाठवण्यात आली आहेत.

किरण अनिल धनवडे (वय २८, रा. उस्मानाबाद) आणि अण्णा शिवाजी बंडगर (वय २३, रा. सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद रघुनाथ कदम यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री संशयितांनी संगनमताने टेम्पोच्या मागील हौद्यात १३ गुरांना आखूड दोरीने दाटीवाटीने बांधून ठेवले होते. या पद्धतीमुळे गुरांना वेदना व यातना होण्याची शक्यता होती. तसेच, कत्तलीसाठी किंवा कत्तलीच्या उद्देशाने विक्री करण्यासाठी ही गुरे वाहून नेली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या गोपनीय माहितीच्या आधारे अलोरे-शिरगाव पोलिसांनी चिपळूण-कराड मार्गावरील पोफळी-पवारवाडी फाटा परिसरात सापळा रचला. संशयितांचा टेम्पो या ठिकाणी येताच पोलिसांनी तो अडवून तपासणी केली. यावेळी टेम्पोमध्ये १३ गुरे आढळून आली. ही गुरे सोलापूरच्या दिशेने नेली जात असल्याची माहिती समोर आली.

पोलिसांनी गुरांसह टेम्पो असा एकूण ९ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुरांना पुढील देखभालीसाठी लोटे येथील गोशाळेत पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी दोन्ही संशयितांना भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार (बीएनएसएस) नोटीस देण्यात आली असून, अलोरे-शिरगाव पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *