गुहागर तालुक्यातील पिंपळवाडी येथे एअरगन निष्काळजीपणे हाताळल्याने संबंधित व्यक्तीलाच दुखापत झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी स्वतःच्या तसेच इतरांच्या जीवितास व व्यक्तिगत सुरक्षिततेस धोका निर्माण केल्याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत अविनाश कदम (वय ४५, रा. साखरीआगर, गणेशवाडी, ता. गुहागर) यांनी १ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे १०.४५ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी स्वतःच्या मालकीची एअरगन बेदरकारपणे व निष्काळजीपणे हाताळली. एअरगन हाताळत असताना चुकून ट्रिगरवर बोट गेल्याने त्यातून छरा सुटला. हा छरा त्यांच्या डाव्या खांद्याला लागल्याने ते जखमी झाले.
या निष्काळजी कृतीमुळे स्वतःच्या तसेच परिसरातील इतर व्यक्तींच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होऊ शकला असता. त्यामुळे या घटनेची गंभीर दखल घेत गुहागर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश शंकर शिंदे (वय ३७), नेमणूक गुहागर पोलीस ठाणे, यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक ५९/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२५(अ) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून घटनेचा पुढील तपास गुहागर पोलीस करीत आहेत.
पोलीसांनी नागरिकांना कोणतेही एअरगन, बंदूक किंवा तत्सम शस्त्र हाताळताना अत्यंत दक्षता बाळगण्याचे आवाहन केले असून, निष्काळजीपणामुळे गंभीर अपघात होऊ शकतात, असेही नमूद केले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













